रविवार दुपारची वेळ. राजेश आणि त्याची आई नुकतेच जेवून उठले होते. आई टीव्हीसमोर जाऊन बसली आणि राजेश खोलीत गेला. काहीवेळाने खोलीतून मोठमोठ्याने मंत्राचा आवाज ऐकू यायला लागला. आई खोलीत जाताच तिने पाहिले की राजेश खोलीचे सर्व पडदे बंद करून एका मिणमिणत्या मेणबत्तीच्या प्रकाशात खोलीच्या कोपऱ्यात डोळे मिटून मोठमोठ्याने काहीतरी म्हणत होता. आई ते सर्व पाहून हबकली.
तिने पटकन लाइट लावले, पडदे उघडले आणि राजेशजवळ जाऊन त्याला हलवून हाका मारू लागली. राजेश दचकला, डोळे उघडले. प्रखर उजेडामुळे त्याला काही काळ अंधुक दिसत होते. आपल्या जवळ असणाऱ्या आकृतीला त्याने पुढचा मागचा विचार न करता पूर्ण ताकद लावून मागे ढकलले. ती ओरडत होती, हा घाबरला. त्याने उठून तिला थोबाडीत मारली. तिने स्वतःला वाचवण्याकरता टेबलवरचे पुस्तक समोर केले. ते भिरकावत त्याने तिचा गळा धरला.

आवाज ऐकून शेजारी घरात शिरले. आईची सुटका केली आणि राजेशला खोलीत बंद करून ठेवले. यासारखे प्रसंग आम्हा मानसोपचारतज्ज्ञांना नातेवाईकांकडून वेळोवेळी ऐकायला मिळत असतात. मानसिक आणीबाणीचे क्षण काही कोणाला सांगून येत नसतात. त्यामुळे प्रत्येक काळजीवाहकाला (Caregiver) आणि सामान्य नागरिकांना ही परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीशी ओळख होणे गरजेचे आहे.

राजेशचे असे काय झाले होते?

त्यालाच मानसिक आणीबाणी म्हणता येईल. (Psychiatric Emergencies) म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात अचानक वैचारिक किंवा भावनिक बदल घडतात आणि त्याचा त्याच्या वागण्यावर परिणाम होतो. त्यामुळे तो स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. यामध्ये प्रमुख लक्षणे म्हणजे स्वतःला संपवण्याचे तीव्र विचार मनात येणे किंवा त्याचा प्रयत्न करणे, इतरांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, तीव्र आक्रमकता, हिंसक वर्तन किंवा नसलेल्या गोष्टी दिसणे/ ऐकू येणे. या काही परिस्थिती अशा आहेत जिथे क्षणाचाही विलंब घातक ठरू शकतो.
पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मानसिक रुग्णांना हाताळणारी शासकीय यंत्रणा नाही किंवा सायकियाट्रिक रुग्णवाहिकाही नाहीत. त्यामुळे या आणीबाणीच्या काळात रुग्णाचे कुटुंबीय आणि काळजीवाहक हेच प्रमुख रक्षक ठरतात.

मानसिक आणीबाणीच्या वेळी काय करायला हवे?
  1. जेव्हा एखादा रुग्ण अचानक आक्रमक होतो किंवा घाबरलेला असतो. तेव्हा काळजीवाहकाने स्वतः शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे. आपला ताबा सुटू न देता, रुग्णाच्या अंगावर न ओरडता शांतपणे बोलण्याने त्यांना अंशतः शांत करण्यास मदत होऊ शकते.
  2. अशी परिस्थिती उद्भवल्यास तातडीने घरातील धारदार वस्तू, शस्त्रे औषधे ज्याने रुग्ण स्वतःला किंवा इतरांना इजा करू शकतो, ते लांब ठेवावे.
  3. वातावरणात जास्त उत्तेजना देणाऱ्या गोष्टी जसे प्रखर उजेड, मोठा आवाज-गाणी, टीव्ही इत्यादी बंद करून शांतता आणण्याचा प्रयत्न करावा.
  4. रुग्ण फार आक्रमक असल्यास त्याच्याजवळ जाणे टाळावे, किमान दोन हात अंतर ठेवावे. रुग्णाला खोलीच्या एका कोपऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे तो अजूनच आक्रमक होऊ शकतो.
  5. स्वतःचा बचाव करता येण्यासाठी मार्ग मोकळा ठेवावा.
  6. रुग्णाला भास होत असल्यास अथवा काही दिसत असल्यास त्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न टाळावा.
  7. "तुला भ्रम होत आहे" किंवा "हे सर्व खोटं आहे" असे म्हणणे टाळावे त्याऐवजी "मला समजू शकतंय की तुला भीती वाटते आहे, त्रास होतो आहे पण मी आहे तुझ्याबरोबर" असे बोलावे.
  8. जेव्हा एखादा रुग्ण स्वतः जीव देण्याची भाषा करतो, ती सुद्धा आणीबाणीची परिस्थिती असते. अशा वेळेला नातेवाईकांनी रुग्णाला एकटे सोडणे टाळले पाहिजे. त्याच्याशी संवाद साधण्याचे मार्ग मोकळे ठेवले पाहिजे. अशा वेळेला आपण हेल्पलाईन, शेजारी अथवा पोलिसांचीही मदत घेऊ शकता.
  9. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. काही इमर्जन्सी गोळ्या असल्यास त्या घ्याव्या व त्रास फार जास्त असल्यास ॲडमिट करून उपचार करावे.
  10. मानसिक आणीबाणीच्या काळात रुग्णाचा वास्तवाशी संबंध तुटलेला असतो. या काळात केअरगिव्हर अर्थात नातेवाईक/मित्रांनी गोंधळून न जाता परिस्थिती संयमाने हाताळावी. स्वतःला व रुग्णाला इजा होणार नाही यासाठी प्रयत्न करावा. मदत घ्यावी. योग्य वेळी मानसिक प्रथमोपचार मिळाल्यास रुग्ण या तीव्र अवस्थेतून बाहेर येऊ शकतो.

(डॉ. ऋचा सुळे खोत नाशिकस्थित ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)