काल समीर त्याच्या आईसोबत आला होता. कॅज्युअल शर्ट, बॅगी पॅण्ट, कानावर हेडफोन, हातात आयफोन. वय असेल २०-२२. त्याच्या आईची एकच तक्रार होती, ‘आमचे काही ऐकत नाही,’ स्वतःच्या खोलीत दिवसभर असतो, काय करतो कळत नाही. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की, समीर इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होता. दरवर्षी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतो. त्याला रॉक म्युझिक आवडते. तो स्वतः एका रॉक बँडमध्ये आहे. हे सर्व त्याने घरी सांगितले, पण आई-वडिलांचे म्हणणे एकच की, आता शिक्षणाकडे लक्ष दे. हे रॉक म्युझिक वगैरे नको. समीर म्हणतो, ‘मला घरचे समजूनच घेत नाहीत, त्यामुळे आता मला घरी जावेसे, कोणाशी बोलावेसे सुद्धा वाटत नाही.’ यातूनच सुरू होतो एक विसंवाद आणि शेवटी नैराश्य आणि एकटेपणा.

‘जेन झी’ची ही गोष्ट. त्यांना ‘अतिसंवेदनशील’, ‘अधीर’ किंवा अडचणींना सामोरे न जाणारी पिढी अशी लेबलं लावून ठोकळेबाज समजूतींच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. आणि मुख्य प्रश्न तपासून पाहण्याची गरज आहे की, त्यांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांना आपण समजून घेतो आहोत का, आपण त्यांचे खरोखर ऐकून घेत आहोत का?
म्हणजे आज भारतातले साधारण १४ ते २९ वर्षांचे तरुण म्हणजे जेन झी असे म्हणता येईल. अगदी बालपणापासून तीव्र शैक्षणिक स्पर्धा, अनिश्चित करिअरच्या संधी, सोशल मीडिया आणि बदलती नाती, अशा भावनिकदृष्ट्या असुरक्षित वातावरणात जगण्याची व स्वतःला सिद्ध करण्याची तारेवरची कसरत या पिढीला करावी लागते आहे. स्वतःच्या आवडीनिवडी आणि पालकांच्या अपेक्षा यातून मार्ग काढणे, स्थिर नोकरी, वाढता जीवनखर्च यांचा समतोल, अशी सतत दुहेरी कसरत, प्रचंड चिंता आणि भावनिक थकवा त्यांच्या वाट्याला येत आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मेंटल बर्नआऊट!

सोशल मीडियामुळे तरुण भारतीयांच्या संवाद साधण्याच्या, शिकण्याचा व नाती निर्माण करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. सतत तुलना करण्याची प्रवृत्ती, सायबर बुलिंग, ऑनलाइन स्वतःची परिपूर्ण आनंदी प्रतिमा दाखवण्याचा दबाव, ऑनलाइन कमेंट्स, ट्रोलिंग आणि टीका यानेही ताण वाढला आहे. विशेषतः तरुणांचे प्रत्यक्ष सामाजिक जीवन आणि ऑनलाइन जग एकमेकांशी जोडलेले असते तेव्हा याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. फिअर ऑफ मिसिंग आऊट अर्थात FOMO वाढतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रोलिंग करत बसल्याने त्याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अर्थात या सर्वांसाठी तंत्रज्ञानाला दोष देण्याऐवजी आरोग्यदायी डिजिटल सवयी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे.

होतं काय?
  1. एखाद्या तरुणाचे सोशल मीडियावर शेकडो फ्रेंड्स असू शकतात. पण अपयश, नकार, असुरक्षितता किंवा दुःख याबद्दल मनमोकळेपणाने बोलण्यासाठी त्यांच्याकडे कदाचित एकही व्यक्ती नसेल. टीका किंवा गैरसमज होण्याची भीती असल्याने काही तरुण आपला त्रासही लपवतात. आनंदी ऑनलाइन प्रतिमा तयार करतात.
  2. सतत वाटणारी चिंता, खिन्नता, उदासीनता, चिडचिड, मित्र-मैत्रिणींना टाळणे, झोपेच्या समस्या, अभ्यासातील घसरण, आवडत्या गोष्टींमधील रस कमी होणे. ही काही चिंताजनक लक्षणे तरुणांच्या बाबतीत दिसली तर यावर टीका करण्याऐवजी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
  3. पालकांनी मुलांना लगेच सल्ला देण्याऐवजी किंवा तातडीने त्यांची चूक सुधारण्यापूर्वी प्रथम त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. नियमित संवाद, वास्तववादी अपेक्षा, चुका करण्याची मुभा यामुळे तरुणांना भावनिक सुरक्षितता मिळू शकते.
  4. मुलांच्या आवडीनिवडी व कुटुंबाच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात. हे पालकांनीही स्वीकारणे गरजेचे आहे. स्क्रीन टाइमबद्दल नियम ठरवताना तेच नियम पालकांसाठीसुद्धा असले पाहिजे. अवास्तव शैक्षणिक अपेक्षांचा दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. खेळ, मनोरंजन व विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे.
  5. शाळा, कोचिंग क्लासेस, महाविद्यालयांतही प्रशिक्षित समुपदेशक मदतीसाठी उपलब्ध असण्याची गरज आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात पालकांनी किंवा तरुणांनीही कोणत्याही प्रकारची लाज वाटून घेऊ नये. गोपनीयतेची चिंता करू नये. आजच्या काळात शारीरिक आरोग्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपचारांइतकीच मानसिक उपचारांसाठीची मदत नाॅर्मल वाटली पाहिजे.
  6. प्रत्येक पिढीला भावनिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र, त्या अडचणींचे स्वरूप आणि त्रासाची अभिव्यक्ती काळानुसार बदलतात. जेन झी ही त्याला अपवाद नाही. ‘मन मोकळे करून बोला’ असं तरुणांना सांगण्यापलीकडे जाऊया. समाज, पालक, शिक्षक म्हणूनही आपण त्यांचं ऐकून घेऊया. ते बोलतील तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा, समजून घेणारा व त्याप्रमाणे कृती करणारा कोणीतरी त्यांच्यासोबत आहे याची त्यांना खात्री वाटली पाहिजे.
भारतात चित्र काय?
  1. भारतातील एकूण मानसिक आजारांपैकी जवळपास ६० टक्के आजार ३५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये आढळतात. या आजारांची सुरुवात सरासरी १९ ते २० वर्षे वयात होताना दिसत आहे.
  2. ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्टनुसार, भारतातील तरुण प्रौढांचा (१८-३४ वर्षे) माइंड हेल्थ कोशंट (MHQ) फक्त ३३ आहे. ८४ देशांमध्ये भारत ६० व्या क्रमांकावर आहे.
  3. सध्या १८ ते २४ वयोगटातील ५१ टक्के तरुण अत्यंत मानसिक तणावाखाली (distressed) आहेत, तर ४९ टक्के तरुण जीवघेणी स्पर्धात्मक परीक्षा आणि डिजिटल व्यसनामुळे तीव्र चिंतेचा (chronic anxiety) सामना करत आहेत.
  4. हाच मानसिक ताण त्यांच्या नोकरीच्या ठिकाणीही दिसून येतो, जिथे ७१ टक्के भारतीय जेन झी कर्मचारी कामाच्या अतिताणामुळे (burnout) त्रस्त आहेत.
  5. २०२६ च्या ‘एमपाॅवर’ (Mpower) सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, ४९.५ टक्के भारतीय तरुण त्यांच्या समस्या लपवून पूर्णपणे एकटेच त्रास सहन करतात, तर केवळ ९.२ टक्के तरुण प्रत्यक्षात मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. ही सर्वात चिंतेची बाब आहे.

(डॉ. विलास चाकोर आणि डॉ. मानस सुळे हे अनुक्रमे नाशिक सायकायट्रिक सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव आहेत.)