"डॉक्टर, एकदा गोळ्या सुरू केल्या की आयुष्यभर घ्याव्या लागतील ना?" "या गोळ्यांची सवय तर लागणार नाही ना?"
-मानसोपचार तज्ज्ञ म्हणून हे प्रश्न आम्ही जवळजवळ रोज ऐकतो. ताप आला, बीपी वाढलं किंवा साखर वाढली तर आपण गोळ्या घ्यायला फारसा विचार करत नाही. पण मनाच्या आजारासाठी गोळी म्हटलं की मनात भीती, शंका आणि लाज दाटून येते. या भीतीमुळे अनेकजण उपचार टाळतात किंवा मध्येच सोडून देतात. म्हणूनच काही सामान्य गैरसमज आणि त्यामागचं सत्य समजून घेऊया.

गैरसमज १: मानसिक आजाराच्या सगळ्या गोळ्यांची सवय लागते?

सत्य: नैराश्य, चिंता, ओसीडी अशा आजारांसाठी दिली जाणारी बहुतेक औषधं दारू किंवा तंबाखूसारखी व्यसन लावत नाहीत. त्यांची तल्लफ येत नाही, आणि "आज जास्त गोळी घेऊ" असंही वाटत नाही. हो, काही झोपेच्या किंवा अस्वस्थतेसाठीच्या गोळ्या दीर्घकाळ, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या तर त्यांची सवय लागू शकते. म्हणूनच डॉक्टर अशा गोळ्या कमी काळासाठी आणि काळजीपूर्वक देतात. धोका गोळीत नाही, तर स्वतःच्या मनाने घेण्यात आहे.

गैरसमज २: गोळ्या बंद केल्यावर त्रास होतो, म्हणजे सवय लागलीच ना?

सत्य: काही औषधं अचानक बंद केली तर काही दिवस चक्कर, अस्वस्थता किंवा झोप बिघडणं असं जाणवू शकतं. पण हे व्यसन नाही, तर शरीर बदलाशी जुळवून घेत असल्याचं लक्षण आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस हळूहळू कमी केला, तर हा त्रास बहुतांश टाळता येतो.

गैरसमज ३: मनाच्या आजाराच्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात?

सत्य: बहुतेक रुग्णांना ठराविक काळासाठीच औषधं लागतात. बरं वाटू लागल्यानंतरही काही महिने औषध चालू ठेवलं जातं, जेणेकरून आजार पुन्हा उलटू नये. काही आजारांमध्ये मात्र दीर्घकाळ औषधं लागू शकतात, अगदी मधुमेह किंवा बीपीसारखी. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही.

गैरसमज ४: गोळ्यांमुळे माणूस सुस्त होतो, त्याचा स्वभावच बदलतो?

सत्य: सुरुवातीच्या काही दिवसांत थोडी झोप किंवा जडपणा जाणवू शकतो. पण योग्य औषध आणि योग्य डोस मिळाल्यावर माणूस उलट "पूर्वीसारखा" होतो. त्याची चिडचिड, भीती, उदासी कमी होते. कुठलाही त्रास जाणवला तर गोळी स्वतः बंद न करता डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला. डोस किंवा औषध बदलता येतं.

गैरसमज ५: बरं वाटलं की गोळ्या मनाने बंद करायच्या?

सत्य: ही सगळ्यात सामान्य आणि महागात पडणारी चूक आहे. बरं वाटतं ते औषधामुळे. मध्येच गोळ्या सोडल्या तर आजार परत येण्याची शक्यता वाढते आणि पुढचा उपचार जास्त लांबतो.

शेवटी एवढंच...
मेंदू हा आपल्या शरीराचाच एक अवयव आहे. हृदयाला, किडनीला जसा आजार होऊ शकतो, तसाच मनालाही. कमी दिसत असेल तर चष्मा लावायला आपण कमीपणा मानत नाही, मग मनाच्या त्रासासाठी औषध घेणं कमजोरीचं लक्षण कसं ठरेल?
औषधांसोबत समुपदेशन, कुटुंबाची साथ, पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या असेल, तर बरं होण्याचा प्रवास अधिक सोपा होतो. मनात शंका असेल तर ती मनातच ठेवू नका. तुमच्या डॉक्टरांना प्रश्न विचारा. योग्य माहिती हीच भीतीवरची सर्वात चांगली गोळी आहे!

(डॉ. देविका पाटील मानसोपचारतज्ज्ञ असून अल्ट्रा एंड्युरन्स रनरही आहेत.)