मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, दमा, संधिवात, स्ट्रोक, न्यूरोलॉजिकल आजार, दीर्घकालीन त्वचारोग, HIV/AIDS किंवा इतर दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक आजारांचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही, तर व्यक्तीच्या भावना, विचार, झोप, आत्मविश्वास, सामाजिक जीवन आणि एकूणच मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. (how to cope with stress caused by chronic pain) त्याचप्रमाणे मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्य यामुळे शारीरिक आजाराचे नियंत्रण आणि उपचारांचे पालनही कठीण होऊ शकते.(chronic pain and depression connection)
आजाराचे निदान झाल्यानंतर सुरुवातीला भावनिक धक्का, भीती, चिंता, दुःख किंवा नकाराची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. अनेक व्यक्ती काही काळानंतर या परिस्थितीशी जुळवून घेतात. मात्र काहींमध्ये ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहू शकतात. “मला आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार का?” “माझे भविष्य काय?” “माझ्या कुटुंबाचे काय होईल?” असे प्रश्न मनात येऊ शकतात.
दीर्घकालीन आजारामुळे आरोग्याबद्दल सतत चिंता निर्माण होऊ शकते. “आज शुगर किती असेल?” “पुन्हा अटॅक तर येणार नाही ना?” “ही वेदना गंभीर तर नाही ना?” अशा विचारांमुळे व्यक्ती सतत आपल्या शरीरातील लक्षणांकडे लक्ष देऊ लागते. काही वेळा ही चिंता इतकी वाढू शकते की दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. याचे रूपांतर चिंता रोग म्हणजेच एंझायटी आजारात होते.
सततच्या वेदना व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. वेदनांमुळे झोप बिघडणे आणि परिणामी थकवा, चिडचिड/नैराश्य, वेदनांकडे अधिक लक्ष जाणे होऊन वेदना अधिक त्रासदायक वाटायला लागतात. तसेच दुखणे, श्वास घेण्यास त्रास, वारंवार लघवी होणे, औषधांचे दुष्परिणाम किंवा आजाराबद्दलची चिंता यामुळे झोप बिघडू शकते. निद्रनाश या आजारमुळे दिवसभर थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि भावनिक अस्थिरता वाढू शकते.
काही आजारांमुळे शरीरात किंवा दिसण्यात बदल होतात. उदाहरणार्थ, कर्करोगावरील काही उपचारांमुळे केस गळणे, शस्त्रक्रियेमुळे शरीरावर व्रण राहणे किंवा वजनात मोठे बदल होणे. यामुळे आत्मविश्वास आणि स्वप्रतिमा खालवते. दीर्घकालीन आजारामुळे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. कामावर जाणे, प्रवास करणे, मित्रांना भेटणे किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे कमी होऊ शकते. काही व्यक्तींना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे “मी इतरांसाठी ओझे झालो आहे” अशी भावना निर्माण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांवरही काळजी, आर्थिक ताण आणि जबाबदाऱ्यांचा अतिरिक्त भार येऊ शकतो.
त्यामुळे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये नैराश्याची लक्षणे दिसू शकतात. सतत उदास किंवा निराश वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणे, थकवा किंवा ऊर्जा कमी वाटणे, झोपेमध्ये बदल, भूक किंवा वजनामध्ये बदल, स्वतःबद्दल अपराधी किंवा निरुपयोगी वाटणे, भविष्याबद्दल निराश वाटणे, एकाग्रता कमी होणे. म्हणजेच शारीरिक आजारामुळे निर्माण झालेल्या मर्यादांमध्ये नैराश्याची भर पडते आणि एकूण अपंगत्व किंवा कार्यात्मक मर्यादा वाढू शकतात. औषधे घेण्याचा उत्साह कमी होतो, उपचारांचा फायदा होईल अशी आशा कमी होते, नियमित तपासण्या टाळल्या जातात, डॉक्टरांनी सांगितलेल्या जीवनशैलीतील बदलांचे पालन कठीण होते.
नैराश्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यविषयक सवयींवरही परिणाम होऊ शकतो. असंतुलित आहार आणि अनियमित खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायाम कमी करणे, धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन सुरू ठेवणे किंवा वाढवणे, झोपेच्या वेळापत्रकात बिघाड, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष. या सवयींमुळे आधीच असलेल्या शारीरिक आजारांचे नियंत्रण अधिक कठीण होऊ शकते. नैराश्य आणि दीर्घकालीन शारीरिक आजार एकत्र असताना मृत्युदर वाढण्याशी संबंधित असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. “हा शारीरिक आजार आहे म्हणून असे उदास वाटते” असे समजून नैराश्याची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. मानसिक आरोग्याची काळजी घेणे हा अतिरिक्त भाग नसून उपचारांचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
शरीर आणि मन यांचा संबंध हा केवळ एकाच दिशेने कार्य करणारा नसतो. जसे दीर्घकालीन शारीरिक आजारांमुळे नैराश्य निर्माण होऊ शकते, तसेच नैराश्यामुळे शारीरिक आजारांचे नियंत्रण आणि उपचार अधिक कठीण होऊ शकतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की नैराश्य असलेल्या शारीरिक आजारांच्या रुग्णांमध्ये आरोग्यसेवेवरील खर्च वाढू शकतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि उपचारांचे पालन करण्यात अडचणी येऊ शकतात.
नैराश्य हे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये प्रतिकूल आरोग्यपरिणामांशी संबंधित स्वतंत्र जोखीम घटक म्हणूनही अभ्यासले गेले आहे. काही संशोधनांमध्ये नैराश्याचा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींशीही संबंध दर्शविला आहे. नैराश्य असलेल्या व्यक्तींना आपला आजार अधिक गंभीर, त्रासदायक आणि निराशाजनक वाटू शकतो. नैराश्यामुळे शारीरिक आजाराशी संबंधित वेदना, थकवा, अशक्तपणा आणि इतर शारीरिक लक्षणांचा व्यक्तीला जाणवणारा त्रास वाढू शकतो.
घरातील कामे करण्यास अडचण, नोकरी किंवा व्यवसायावर परिणाम, सामाजिक संबंधांमध्ये घट, स्वतःची काळजी घेण्याची क्षमता कमी होणे, कुटुंबीयांवरील अवलंबित्व वाढणे अशी दिसू लागतात. उपचारांमध्ये आजाराबद्दल योग्य माहिती आणि समुपदेशन, ताण व्यवस्थापन, झोप आणि जीवनशैली सुधारणे, कुटुंबाचा आणि सामाजिक आधार, आवश्यक असल्यास औषधोपचार यांचा समावेश होऊ शकतो. शारीरिक आजाराची औषधे आणि मानसिक आरोग्याची औषधे यांच्यात परस्पर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मानसिक लक्षणांसाठी स्वतःहून औषध घेण्याऐवजी संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कुटुंबीयांनी रुग्णाचे बोलणे शांतपणे ऐकावे, त्याच्या भीती किंवा चिंतेची टिंगल करू नका, उपचारांमध्ये सहकार्य करा, डॉक्टरांच्या भेटींना आवश्यक असल्यास सोबत जा, शक्य तितकी दैनंदिन दिनचर्या टिकवून ठेवण्यास मदत करा, लहान सकारात्मक बदलांचे कौतुक करा, मानसिक लक्षणे दिसल्यास त्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करण्यास प्रोत्साहित करा. सहानुभूती म्हणजे समस्या नाकारणे नव्हे; समस्या समजून घेऊन सोबत राहणे होय. शारीरिक आजारावर उपचार करताना रुग्णाच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन करणेही तितकेच आवश्यक आहे.
(डॉ. महेश भिरुड मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)