कधीतरी बालपण स्क्रीनशिवायही सुंदर होतं…बालपण… मोकळं आकाश, झाडांमागची लपाछपी, पावसात भिजणं, मित्रांसोबतचे खेळ आणि अगदी छोट्याशा गोष्टीत सापडणारा मोठा आनंद. तेव्हाचं जग हेच मुलांसाठी एक मोठ्ठं खेळाचं मैदान होतं.
आज तेच बालपण हळूहळू एका स्क्रिनमध्ये सामावू लागलं आहे. तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य अधिक सोपं, जलद आणि जोडलेलं केलं; पण या क्षणाक्षणाला समाधान देणाऱ्या जगात एक प्रश्न थांबून नक्कीच विचारायला हवा की आपल्या मुलांच्या आयुष्यातून आपण नकळत काही मौल्यवान गोष्ट कमी तर करत नाही ना?
कोरोना महामारीने या बदलाला आणखी वेग दिला. JAMA Pediatrics मधील ४६ अभ्यासांच्या मेटा ॲनालिसिसमध्ये २९,०१७ मुले आणि किशोरवयीनांचा समावेश होता. महामारीदरम्यान स्क्रीन टाईममध्ये सरासरी ८४ मिनिटांची म्हणजेच ५२% वाढ दिसली. १२ ते १८ वर्षांच्या किशोरवयीनांमध्ये ही वाढ सुमारे ११० मिनिटे प्रतिदिन होती. मुद्दा फक्त ‘किती वेळ?’ एवढ्यापुरताच मर्यादित नाही. कारण त्याच्या एवढाच दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की स्क्रीन आपल्या मेंदूला कशाची सवय लावत आहे?
किशोरवयात मेंदू विकसित होत असतो आणि reward व social approval बद्दलची संवेदनशीलता विशेष असते. डोपामिन हा केवळ आनंद देणारा neurotransmitter नाही; तो प्रेरणा, अपेक्षा आणि एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी होणारी इच्छा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. एक नोटीफिकेशन, एक लाईक आणि एक नवीन रिल आणि पुन्हा एकदा स्क्रिन... पुन्हा पुन्हा तेच तेच असं सतत सुरू असतं. पुढे काय मिळेल याची उत्सुकता असतेच. हिच या डिजिटल जगाची एक ताकद आहे. सतत बदलणाऱ्या, अनिश्चित digital rewards मुळे आपण पुन्हा पुन्हा स्क्रीनकडे वळू शकतो.
किशोरवयीन मुलांवर जवळपास ३ वर्षे अभ्यास करण्यात आला. त्या असं दिसून आलं की वारंवार social-media checking आणि सामाजिक reward कडे मेंदूच्या संवेदनशीलतेतील बदल यांच्यात संबंध आढळला. मात्र हा संबंध कारण-परिणाम सिद्ध करत नाही. म्हणून या विषयाकडे भीतीने नव्हे, तर समजून घेऊन पाहण्याची गरज आहे. यासोबत निर्माण होणारा आणखी एक प्रश्न म्हणजे स्क्रिनच्या पलीकडच्या आयुष्यातला जिवंतपणा आपण आपल्या मुलांसाठी आणि मुलांबरोबर किती अनुभवतो आहोत?
किशोरवयीन मनाला स्क्रिनपेक्षा अधिक काही हवं असतं. त्यांना थोडा कंटाळा येऊ द्या. शांतता अनुभवू देऊया. खेळ, संगीत, पुस्तकं, निसर्ग आणि प्रत्यक्ष संवादासाठी जागा ठेवूया. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्यासोबत स्क्रिनकडे पाहण्याऐवजी एकमेकांकडे पाहण्याचा वेळ निर्माण करूया. कारण स्क्रिनचा उजेड डोळ्यांना दिसतो, पण मनाला उजेड देतात ती नाती, तुमच्याजवळची माणसं...
शेरी टर्कल म्हणतात, “We expect more from technology and less from each other.” म्हणून मुलांच्या हातातून फक्त स्क्रीन काढून घेण्यापेक्षा, त्यांच्या हातात पुन्हा काही खरं ठेवूया—माणसाचा हात, खेळाचं मैदान, पुस्तकाचं पान, निसर्गाची शांतता आणि निःसंकोचपणे बोलता येईल असं एक मन. त्यांना प्रत्येक like मध्ये आपली किंमत शोधण्याऐवजी, “तू आहेस म्हणून तू महत्त्वाचा आहेस” हे कुणाच्या तरी डोळ्यांतून अनुभवता यावं. कारण किशोरवयीन मनाला केवळ stimulation नको असतं—त्याला समजून घेतलं जाण्याची, स्वीकारलं जाण्याची आणि जोडलेलं असल्याची जाणीव हवी असते. म्हणून थोडं थांबूया. थोडं ऐकूया. थोडं पुन्हा एकमेकांकडे पाहूया. कारण मुलांचं बालपण notification मध्ये वाढत नाही; ते प्रश्न विचारताना, मनापासून हसताना, चुकताना, खेळताना आणि “मी तुझ्यासोबत आहे” ही न बोलताही जाणवणारी भावना अनुभवताना वाढतं.कदाचित मानसिक आरोग्याची सुरुवात स्क्रिन बंद करण्यात नाही तर त्या स्क्रिनच्या पलीकडे असलेल्या मनापर्यंत पुन्हा एकदा पोहोचण्यात आहे. कारण तंत्रज्ञान आपल्याला जोडण्याची साधनं देऊ शकतं; पण जोडलेपणाची अनुभूती—ती अजूनही माणूसच देतो.
(डॉ. तन्वी खबिया (गुगळे))