स्वभावदोष प्रत्येक व्यक्तीचे एक विशिष्ट व्यक्तिमत्व असते. या व्यक्तिमत्वामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे स्वभाव गुण सगळ्यांमध्येच दिसून येतात. परंतु काहींच्या बाबतीत मात्र हे गुण एका मर्यादे पलीकडे जाऊन त्रासदायक ठरतात. त्यांना या आपल्या गुणांबद्दल कळतं किंवा काही लोकांना कळत देखील नाही. परंतु सभोवतालच्या लोकांना मात्र त्यांचे हे स्वभाव गुण, विचार, भावना, वर्तणूक इतरांपेक्षा खूप वेगळे आणि विकृत जाणवतात. स्वभावाला औषध नाही असा ठाम समज आपल्या समाजात दिसून येतो. परंतु एखाद्याचा स्वभाव दोष किंवा विकृत स्वभाव गुणांमुळे इतर लोक त्रासलेले असतात, त्यावेळी मानसोपचार तज्ञांची मदत उपयोगी पडू शकते. सर्वसामान्यपणे दहा ते वीस टक्के लोकांमध्ये कुठल्यातरी प्रकारचा स्वभाव दोष दिसून येतो. अनुवंशिकता, जन्मत: मिळणारे स्वभाव गुण, सभोवतालच्या व्यक्तींचे वर्तन, एकमेकांसोबत घडणारा व्यवहार, चहूबाजूंनी मिळणारे अनुभव, शिक्षण, वाचन, संस्कार इत्यादी अनेक घटक आपला स्वभाव- व्यक्तिमत्व घडवण्यात मोठी भूमिका निभावतात. काही मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे व्यक्तिमत्व दोषाचे मूल्यमापन करून निदान करणे सोपे जाते. एखाद्या व्यक्तीमध्ये एकाहून अधिक स्वभावदोष देखील आढळू शकतात. लहानपणापासून स्वभावातील विकृत गुण हळूहळू दिसत असले तरी साधारणतः या मनोविकाराचे निदान वयाच्या 18 वर्षानंतर केले जाते. शास्त्रीय पद्धतीने स्वभाव दोष हे साधारणतः ए, बी आणि सी अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहेत. स्किझोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अशा लोकांना साधारणपणे आपल्या समाजामध्ये अबोल, एकलकोंडे असे म्हटले जाते. या स्वभावदोषाचे लोक समाज संबंधांपासून अलिप्त राहतात आणि जवळच्या नातलगांमध्ये असताना फारच सीमित भावनिक हावभाव दर्शवितात. त्यांची कुणाशीही वैयक्तिक घट्ट संबंध, जवळीक किंवा सलगी करण्याची मनात इच्छा नसते. तसे सौख्य जुळविण्याची संधी चालून आली तरी त्याबद्दल हे लोक बेफिकीर असतात. कुटुंबाचा आणि समाजाचा भाग असल्यातून त्यांना काही समाधान मिळत नाही. मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत राहण्यापेक्षा त्यांना एकटंच राहणं जास्त पसंत पडतं. सतत मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसणे, शब्दकोडे सोडवणे, संगणकीय खेळ, वाचन इत्यादी आणि जेथे इतरांचा फारसा सहभाग नसेल अशा तांत्रिक व कल्पनात्मक छंद व कार्यात ते मग्न असतात. ते कुणाला भेटत नाही किंवा कोणी त्यांना भेटायला येत नाही, नातलगांच्या आग्रहाखातर लग्न केले तरी वैवाहिक जीवनातही ते एकलकोंडेच व उदासीन दिसतात, त्यांची कोणी स्तुती किंवा टीका केली तरी देखील काहीही फरक पडत नाही. इतर लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याची देखील त्यांना फिकर नसते. सभोवताली घडणाऱ्या गुढ मार्मिक कुठल्याही घटनांबद्दल त्यांना काही घेणेदेणे नसते, त्यावर ते काही प्रतिक्रिया देखील दाखवत नाहीत. इतर लोक त्यांना मक्ख, एकदम थंड स्वभावाचे व त्यांच्या नाकावरील माशी देखील उडत नाही असे म्हणतात. स्किझोइड व्यक्तिमत्व असलेले लोक कधीतरी थोडेसे हास्य प्रकट करतात किंवा फक्त मान डोलावतात. समोरून कोणी डिचवलं, थट्टा मस्करी केली तरी देखील त्यांना क्रोध, आनंद अशा भावना उफाळून दिसत नाहीत. जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते निष्क्रिय राहतात. परंतु एकट्यानेच करण्याचे काम व्यवहार ते चांगल्या प्रकारे करू शकतात. तणावजन्य परिस्थितीमध्ये भावनिक तोल सांभाळता न आल्याने थोड्या काळासाठी ते भ्रमिष्ट होऊ शकतात. स्कीझोईड स्वभावदोष हा मतीभ्रम किंवा स्किझोफ्रेनिया अशा मनोविकारांचे पूर्व संकेत वा सूचना ठरू शकतो. एकलकोंडा लोकांना औदासिन्य आजार व इतर स्वभाव दोषही जडू शकतात. साधारणतः जनसामान्यात दोन ते चार टक्के, प्रामुख्याने पुरुषांमध्ये संशयी स्वभाव दोष किंवा प्यारानोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर दिसून येतो. या विकृत स्वभावामध्ये व्यक्तीला सतत इतरांबद्दल संशय, अविश्वास जाणवतो आणि इतरांचे हेतू त्यांना नेहमी द्वेष पूर्ण वाटतात. लोक आपला गैरफायदा घेतात, फसवतात, लबाडी करतात, इजा पोहोचवतात असे यांना वाटत असते. पुरावा नसताना देखील अशा बाबी ते सत्यच मानतात. कधीही थोड्याशा किंवा काहीही खाणाखुणा नसताना लोक आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतात, आपल्यावर हल्ला करतील असा संशय देखील त्यांना जाणवतो. संशयी व्यक्तिमत्त्वाचे लोकांना नेहमीच असे वाटते की दुसऱ्या लोकांनी त्यांना खोलवर दृढ इजा केलेली आहे. मनात मित्र सहकाऱ्यांच्या निष्ठा विश्वासाबद्दल असमर्थनीय शंका कुशंकांनी घर केलेले असते. त्यांच्या दृष्टीने आढळलेली इतरांची थोडीशी चूक त्यांच्या मानलेल्या गृहीत गोष्टीला आधार देते. त्यांना ज्यावर विश्वास नाही अशा एखाद्याने निष्ठा दाखवल्यास ते आश्चर्यचकित होतात. एखाद्या संकटात सापडल्यास मित्र व आप्त मंडळी एकतर आपली खिल्ली उडवतील, टीका करतील वा दुर्लक्षच करतील असे ते अपेक्षित धरतात. इतरांशी जवळीक साधण्यास व विश्वासाने काही सांगण्यास ते नाखूष असतात, कारण अशी माहिती त्यांच्या विरुद्ध वापरली जाईल अशी भीती असते. इतरांशी काही घेणेदेणे नाही असे म्हणून वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात. सौम्य कनवाळू शेरा वा घटनांचा ते धमकी वजा छुपा उलट अर्थ लावतात. जसे छोट्याशा चुकीचा हेतू पुरस्सर केलेला कट वा प्रासंगिक थट्टा मस्करीचा गंभीर चारित्र्यावरील घणघात समजतात. स्तुती प्रशंसेचा चुकीचा अर्थ काढतात, जसे प्रगतीबद्दल स्तुती केल्यास स्वार्थीपणाबद्दलच टीका वाटते, कोणी मदतीचा हात पुढे केल्यास आपण स्वतः अपुरे पडत असल्याची टीका होते असे वाटते. इतरांबद्दल नेहमी असूया, द्वेष वाटतो. त्यांच्या दृष्टीने इतरांनी केलेल्या अपमान आणि नुकसानाबद्दल क्षमा करण्यास ते कधीही तयार होत नाही. शुल्लक अनादर त्यांच्या मनात भयंकर शत्रुत्व निर्माण करतो आणि अशा विरोधी भावना दीर्घकाळ मनात रुतून बसतात. इतरांच्या अपायकारक हेतूंबद्दल ते सतत सावध सतर्क असतात, वाटलेल्या अपमानाचा बदला ते संधी न दवडतात ताबडतोब आक्रोश – रागाने प्रतिहल्ला चढवत व्यक्त करतात. ते विकृतपणे मत्सरी असतात, पुराव्या अभावी आयुष्याच्या जोडीदाराच्या चरित्रावर संशय घेतात, त्यासाठी व्यर्थ शिल्लक पुरावे गोळा करतात, आंतरिक सलगी व्यवस्थित राहून विश्वासघात होऊ नये या भीतीने ते जोडीदारावर पुरेपूर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी नजर ठेवून ते वारंवार जोडीदार कुठे आहे, काय करतोय असे चरित्राबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतात. असा संशयी स्वभाव दोष असणाऱ्या लोकांसोबत पटणे कठीण असते व त्यांच्याशी जवळचे नातेसंबंध टिकवण्यात अनेक समस्या उत्पन्न होतात. राजरोसपणे वादविवाद, सततच्या तक्रारी आणि रागाने एकटे, शांत राहून त्यांचा अतिजास्त संशय आणि वैरभाव दिसून येतो. संभाव्य धोक्याबद्दल नेहमी अतिदक्ष असल्याने ते सावधतेने गुप्त अविर्भावात वेगळेच वागतात. ज्यामुळे मायाळू प्रेमळपण नसून ते भावनाशून्य आतल्या गाठीचे जाणवतात. सत्यवादी, समजदार व गंभीर वाटत असले तरी बहुतांशी त्यांच्या चेहेऱ्याचे हावभाव प्रामुख्याने सतत बदलणारे, हट्टी, दुराग्रही, मर्मभेदक, झोंबणारे दिसत असतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे सभोवतालच्या लोकांची चिडचिड होते. स्कीझोटाईपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच विक्षिप्त स्वभाव विकृती. हा या शृंखलेतील तिसरा व्यक्तिमत्व गुणदोष. या प्रकारामध्ये व्यक्तीचे विचार आणि चेहऱ्यावरील हावभाव यामध्ये विक्षिप्तपणा दिसून येतो. बोटांशी काहीतरी चाळा करणे, कसलाचा गुरुमंत्र म्हणणे, वहीमध्ये काहीतरी मंत्र लिहीत बसणे, एखाद्या गोष्टीवर अनाठाई तक्रारी करणे, कोणावर विश्वास न ठेवणे, ग्रह तारे ज्योतिष यांच्यावर अनाठाई अतिविश्वास, उपवास जप मंत्र पूजाअर्चा अशा गोष्टींमध्ये भरपूर वेळ घालवणे, शुभ अशुभ बघत राहणे, स्वप्नांचा त्याच्याशी संबंध लावणे, चिडचिड करणे रागावणे, विक्षिप्त विचित्र आणि स्वमग्न असे हे व्यक्ती असतात. ते चिंतामग्न, संशयी, अविश्वासू, अंधश्रद्धाळू, स्वप्नाळू आणि आभासी विश्वात रमणारे असतात. इतर लोकांना ते रुक्ष, निरस व भावनाशून्य जाणवू शकतात. अवैज्ञानिक असे जादुई विचार करण्यात ते मग्न असतात. अशा स्वभावदोषाच्या व्यक्तींना उदासीनता, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता असल्या प्रकारचे मनोविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते. एकंदरीत स्वभावदोषांमध्ये अस्थिर भावना असलेला बॉर्डर लाईन स्वभावदोष सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दुपटीने दिसणाऱ्या या प्रकारात