मानसशास्त्र - काल आज आणि उद्या
डॉ. शिरीष सुळे
मानसशास्त्र किंवा त्या आधी माणसाचे मन व त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धती या शरिरापासून वेगळ्या आहेत असे सिद्धांत साधारण १७ व्या शतकात मांडले गेल्याचे पुरावे सापडतात. यातूनच हळूहळू मानसशास्त्र या एक संपूर्णपणे स्वतंत्र शास्त्राचा जन्म झाला. १८७९ साली जर्मनी मध्ये जगातील सर्वात प्रथम मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उघडण्यात आली. यामुळे मानसशास्त्रला विज्ञानाचे पाठबळ मिळाले व अनेक प्रयोग सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत अनेक विचारवंतांनी त्यांचे विचार मांडून विविध विचारधारांचा जन्म झाला.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला मनोविकृतीशास्त्र म्हणजेच सायकिऑस्ट्रीचा जन्म झाला. यामुळे माणसाच्या वागण्यातील बदल हे आजार असू शकतात व त्यावर उपचार होऊ शकतात हे सिद्ध झाले. पण त्या काळात देखील पुराव्यांच्या अभावी या शास्त्राबद्दल आणि त्याचा वापर करणाऱ्या डॉक्टरांविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले व ते आजतागयत थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या मनात आजही घर करून आहेत.
भारतामध्ये सर्वप्रथम मेंटल हॉस्पिटल हे मुंबई मद्ये सुरु करण्यात आले. त्या पाठोपाठ NIMHANS बेंगलुरची स्थापना झाली. भारतीय मासोपचार संघटनेची स्थापना भारतभरातील मूठभर मानसोपचारतज्ञांनी एकत्र येऊन केली व भारत सरकार तर्फे १९८७ साली मानसिक आरोग्य कायदा बनवण्यात आला.
सुरुवातीला भारतामध्ये मोठी शहरं वगळता मानसोपचाराचा अभाव होता. त्यामुळे अनेक रुग्णांना मदत मिळायला उशीर होत असे किंवा नेणे शक्य नसल्यास त्यांच्यावर कधी उपचारच होत नसे. औषधोपचारापेक्षा देवाधर्माकडे जास्त कल असल्याने बाहेरचे बाबा बुवांचे उपचार केले जात. त्यामुळे मानसिक आजारांचे मूळ हे भूतबाधा, हवा टाकणे वा मंतरल्यामुळे होत असल्याचा लोकांना विश्वास वाटू लागला. या बरोबरच पेशंटचे होणारे हाल पण वाढू लागले. त्यांना कोंडून ठेवणे, बांधून ठेवणे, देवाधर्माच्या ठिकाणी साखळदंडाने बांधणे हे उपचार म्हणून केले जात असे. या रुग्णांना जेव्हा औषधोपचाराचा फायदा जाणवू लागला तेव्हा हळूहळू लोकांचा कल हा डॉक्टर आणि दवाखान्याकडे वळायला लागला.
पूर्वी उपचारासाठी उपलब्ध असलेली औषधे देखील खूप मर्यादित होती. पण गेल्या ५० वर्षात अनेक प्रकारच्या नवीन औषधांचा व उपचार पद्धतीचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आजकाल तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांसोबतच इंजेक्शन वाटे देण्यासाठी देखील अनेक औषधे उपलब्ध आहेत. महिन्यातून, पंधरा दिवसातून एकदा इंजेक्शन वाटे औषध शरीरामद्ये सोडता येते असही तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे. पूर्वापार चालत आलेल्या विद्वयत उपचारपद्धतीमध्ये देखील खूप बदल झाला आहे. त्यामुळे त्याचे होणारे दुष्यपरिणाम अगदी नगण्य झाले आहेत. त्याच बरोबर मेंदूला रसायने बनविण्यासाठी उद्युक्त करण्याकरता RTMS/TCDS हे उपचार आता पाश्च्यात्य देशांमद्ये आणि भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध झाले आहेत. या पुढे Artificial Intelligence चा वापर करून आणि तंत्रज्ञानाच्या आधारे fMRI सारख्या Tests करून माणसाच्या वागण्यामागचे अर्थ आणि भावना याचीही माहिती मिळू शकेन.
५० वर्षांपूर्वी मानसिक आजार म्हणजे वेड लागणे एवढाच समज होता त्यामुळे मानसरोगतज्ञांची ओळख फक्त वेड्यांचे डॉक्टर अशीच होती. आजारी व्यक्तींना सांभाळण्यासाठी साखळ्या, दोरखंडांचा वापर सर्रास केला जात असे व नाईलाजास्तव डॉक्टरकडे आणले जात असे. मानसिक आजार म्हणजे कलंक मानले जायचे. म्हणूनच आम्हा मानसरोगतज्ञांना समाजात वावरतांना काही नियम पाळावे लागत. कुठल्याही व्यक्तीने कार्यक्रमात ओळख दाखवल्याशियाय आपण ओळख दाखवायची नाही. पेशंट रात्री अंधार झाल्यावर दवाखान्यात येत असत. डॉक्टरांबद्दल पण अनेक गैरसमज होते – डॉक्टर सम्मोहन करतात, बाहेरची विद्या जाणतात इत्यादी पण आता चित्र बदलले आहे.