Nashik Psychiatric Society

मानसशास्त्रीय चाचण्या व त्याचे महत्व

मानसशास्त्रीय चाचण्या व त्याचे महत्व

डॉ. ऋचा सुळे खोत
बऱ्याच वेळेला मानसशास्र्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावर सल्ला दिला जातो कि आपण आधी पेशंटची मानसशास्त्रीय तपासणी किंवा Psychometric Test करून घेऊया. या चाचण्या म्हणजे नक्की काय असतात? त्याचा उपयोग कसा होतो? त्या करण्यामागचे फायदे काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

मानसशास्त्रीय चाचण्या ह्या एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेची व वागण्या बोलण्याची तपासणी करणाऱ्या संरचित व प्रमाणीत केलेल्या प्रश्नांचा संच असतो. सहसा या तपासण्या ‘हो’ ‘नाही’ आशी उत्तरं असणारे प्रश्न विचारतात. आपल्याला येणाऱ्या अनुभवाप्रमाणे आपण यांचे उत्तर प्रामाणिकपणे देणे अपेक्षीत असते. या चाचण्यांमध्ये व्यक्तीचा स्वभाव, बुद्धीमत्ता, भावना, नैसर्गिक क्षमता व कार्य कौशल्य यांचे मोजमाप केले जाते. त्याच बरोबर काही प्रकारच्या मानसिक आजारांची जडण झाली असल्यास त्याचा अंदाज देखील या तपासावाटे लावता येतो. या चाचण्या प्रशिक्षीत मानस शास्त्रज्ञांद्वारे दिल्या जातात. त्याचे विश्लेषण केले जाते व त्यातून तयार झालेला अहवाल समजावून सांगितला जातो. याच बरोबर या पुढे उपचारासंदर्भात कोणता मार्ग योग्य असेल याचा देखील सल्ला दिला जातो.
मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार 
१. बुद्धिमत्ता चाचण्या (Intelligence tests) – व्यक्तीच्या वयानुसार व शिक्षणानुसार या केल्या जातात Eg – BKT, WAIS, WISC, VSMS etc.
२. स्वभाव चाचण्या (Personality tests) – व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ठ ओळखणाऱ्या चाचण्या Eg – MMPI, MCMI.
३. क्षमता व कार्य कौशल्य चाचण्या (Aptitude tests) – व्यक्तीच्या कार्यक्षमता व योग्य व्यवसाय निवडायला मदत करणाऱ्या चाचण्या .
४. न्युरोसायकॉलॉजिकल चाचण्या – व्यक्तीच्या संज्ञानात्मक (DAT) क्षमता व मेंदूचे कार्य तपासणाऱ्या चाचण्या WAIS, MMSE
५. प्रोजेक्टीव चाचण्या – काही संदिग्ध (ambiguous) चित्रांवर व्यक्तीचे मत जाणून घेऊन त्याच्या अंतरमनाला उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाचण्या Eg – ROR, TAT, CAT.
मानसशास्त्रीय चाचण्यांचे महत्त्व
१. वैद्यकीय निदान – या चाचण्यांवाटे व्यक्तीच्या आजाराची पुष्टी केली जाऊ शकते ज्यामुळे डॉक्टरांना किंवा सायकॉलॉजिस्टला पुढच्या उपचारासंदर्भात निर्णय घेणे सोपे जाते .
२. विशेष शैक्षणिक गरज ओळखण्यासाठी – या चाचण्यावाटे एखाद्या विध्यार्थाच्या विशेष गरजा ओळखल्या जाऊ शकतात जसे कि – Learning disability, Slow learner व त्या प्रमाणे त्याचा शिक्षणात त्याची मदत केली जाऊ शकते.
३. योग्य नौकरची निवड व करियर चे नियोजन – या चाचण्या व्यक्तीचा स्वभाव व क्षमता याची योग्य मेळ घालून कोणता नौकरी व्यवसाय निवडावा ज्यामध्ये व्यक्तीला आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर करता येईल हे शोधण्यासाठी मदत करतात.
४. कधीकधी कायद्याच्या अडचणींमध्ये देखील या चाचण्यांची मदत घेतली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीची मानसिक योग्यता, गुन्हेगारी वृत्ती दाखवण्यासाठी कोर्ट देखील या चाचण्यांचे आदेश देऊ शकते.
५. शlरत्रज्ञांना मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू उलगडण्यासाठी व विविध सिद्धांत तपासण्यासाठी देखील मानसशात्रीय तपासण्यांचा फायदा होतो.
६. एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वभावाचे वा वागण्याचे विश्लेषण करून स्वयंसुधारणा करायची असेल अथवा आपली नेतृत्व क्षमता वाढवायची असल्यास देखील या चाचण्यांचा फायदा होतो.

Scroll to Top