Nashik Psychiatric Society

लैंगिक आरोग्य : गुप्ततेपासून जागरूकतेकडे

लैंगिक आरोग्य : गुप्ततेपासून जागरूकतेकडे

डॉ. हेमंत सोननीस
मानसोपचार तज्ञ नाशिक

शारीरिक संबंध, लैंगिक समस्या हा आपल्याकडे मुळातच कमीत कमी बोलला जाणारा, कमीत कमी चर्चा केला जाणारा विषय. शाळेत शिक्षकांना, घरात मोठ्यांना, मुलांशी या विषयावर बोलताना नेहमीच अडचण येते, असा अनुभव आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने पूर्वी इकडून तिकडून मित्र–मैत्रिणींकडून ऐकून, काहीतरी पुस्तक वाचून, आजकाल इंटरनेटवर, यूट्यूबवर, गूगलवर बघून याबद्दल काही ना काही माहिती मिळवत असतात. बऱ्याचदा अनधिकृत अशा या माध्यमातून मिळालेली माहिती ही चुकीची असते, गोंधळात टाकणारी असते. आणि त्यामुळे अनेक जणांना लैंगिक जीवनाबद्दल योग्य शास्त्रीय माहिती मिळालेली नसते.

तसेच हा विषय जीवनाचा मूलभूत भाग आहे. जशा आपल्या इतर सर्व जबाबदाऱ्या आहेत, गरजा आहेत, तशी ही पण एक गरज आहे, जबाबदारी आहे; हा संदेश घरातल्या मोठ्यांकडून, समाजातल्या महत्त्वपूर्ण घटकांकडून वाढत्या वयात बऱ्याचदा मुला –मुलींना दिला जात नाही. त्यामुळे चुकीची माहिती किंवा गैरसमज किंवा अज्ञान मोठ्या प्रमाणात दिसते. आमच्याकडे येणाऱ्या बहुतेकशा लोकांमध्ये आम्ही ज्या लैंगिक समस्या बघतो त्यामध्ये ही मुख्य कारणे दिसतात.

एकदा माझ्याकडे एक आयटी कंपनीत काम करणारे इंजिनिअर जोडपं आलं होतं. असे काही जोडपे आधीही आलेली आहेत की, सज्ञान, सुशिक्षित, बाकी सगळं कळत पण प्रत्यक्षात शारीरिक संबंध कसे ठेवायचे हेच दोघांपैकी एका जोडीदाराला माहिती नसतं किंवा दोघांनाही माहिती नसतं. आणि बऱ्याचदा वंध्यत्व उपचार घेण्यासाठी जेव्हा ते स्त्रीरोग तज्ञांकडे जातात तेव्हा अशा एक–दोन स्त्रीरोग तज्ञांनी माझ्याकडे असं एक जोडपं गेल्या काही दिवसात पाठवलेलं मला आठवतंय.

दुसऱ्या बाजूला किशोरवयीन पिढी, तंत्रज्ञानाच्या भस्मासुरासारख्या प्रभावाखाली , किंवा peer pressure मध्ये , एकमेकांचे अनुकरण करत, खूप वेगळ्या प्रकारे लैंगिक जीवनात गुंतलेली दिसते. त्यामध्ये असुरक्षित शारीरिक संबंध, एकावेळी अनेक संबंध ठेवणे हे प्रकार दिसतात. पुरेशी काळजी घेतली जात नाही. गुंतागुंत होते, अनपेक्षित गर्भधारणा राहते. असे बरेच विषय दिसतात.

लिंगात ताठरता येत नाही म्हणून घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न करायची वेळ येते, त्यावेळी आमच्याकडे उपचारासाठी आलेली उदाहरणे आहेत. ही बहुतेक उदाहरणं सांगण्याचं कारण म्हणजे, यामध्ये आमच्याकडे येणाऱ्या किंवा समाजात दिसणाऱ्या लैंगिक समस्यांपैकी ९९% या मानसिक स्वरूपात उत्पन्न झालेल्या असतात. आणि त्यावर बहुधा १०० % इलाज असतो.

पुरुषांमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे Erectile Dysfunction – लिंग शिथिलता (ताठरता न येणे). काही अभ्यासांनुसार १५ ते २० टक्के पुरुष या विकाराने त्रस्त आहेत. यामुळे पुरुषाला संभोगावेळी पुरेशी उर्जा मिळत नाही.

दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे Premature Ejaculation – अति लवकर वीर्यस्खलन, जी सुमारे ८–१० टक्के पुरुषांमध्ये आढळते.

त्याशिवाय अनेक पुरुषांना कामेच्छा कमी होणे हा देखील त्रास जाणवतो.

गैरसमज आणि अज्ञान खूप आहे. “वीर्य कमी झाले” , अति प्रमाणात शारीरिक संबंध ठेवल्याने किंवा हस्तमैथुन केल्याने अशक्तपणा आला, लघवी वाटे वीर्य बाहेर पडल्याने थकवा आला असे अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणावर दिसतात. अशा गैरसमजुतींमुळे मानसिक ताण आणि अपराधीपणाची भावना वाढताना दिसते, न्यूनगंड निर्माण होतो.

महिलांमध्ये सर्वात जास्त दिसणारी समस्या म्हणजे कामेच्छेचा अभाव. काही संशोधनानुसार सुमारे २० ते २५ टक्के महिलांना ही अडचण भासते. त्याशिवाय काहींना संभोगावेळी वेदना, आनंद न मिळणे, किंवा शारीरिक उत्तेजना कमी होणे अशा समस्या दिसतात. या विकारांवर उघडपणे चर्चा न झाल्यामुळे अनेक महिला शांतपणे त्रास सहन करतात.

मानसिक ताण, नैराश्य, नात्यातील तणाव, चुकीच्या समजुती, व्यसनाधीनता या गोष्टींमुळेही लैंगिक विकार विकार वाढतात. भारतात अजूनही लैंगिक शिक्षण कमी असल्यामुळे लोकांना योग्य माहिती मिळत नाही.

लैंगिक विकार होणे यात लज्जास्पद असे काही नाही. हे आजार इतर आरोग्याच्या समस्यांप्रमाणेच उपचाराने सुधारू शकतात. त्यामुळे समस्या असल्यास युरोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी नक्की संपर्क साधावा. लैंगिक आरोग्य हीसुद्धा आरोग्याचीच एक महत्त्वाची बाजू आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास बहुतेक समस्या दूर होऊ शकतात.

त्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे विज्ञानाच्या संशोधनातून निर्माण झालेली आहेत. Viagra सारखी गोळी सर्वसामान्यांना परिचित आहे. तसेच विविध प्रकारच्या मानसोपचार पद्धती/ समुपदेशन, जीवनशैलीतले बदल जसे की व्यायाम, खेळ, क्रीडा, कला, पुरेशी झोप अशी निरोगी जीवनशैली या सर्व गोष्टी आपल्याला लैंगिक जीवन सक्रिय ठेवण्यास मदत करतात. व्यसनांपासून दूर राहणे आणि उघड संवाद यामुळेही मोठा फायदा होतो. त्यामुळे चुकीच्या स्रोतापासून माहिती घेण्याऐवजी या विषयावर कोणतीही समस्या वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

डॉ. हेमंत सोननीस
मानसोपचार तज्ञ नाशिक

Scroll to Top