Nashik Psychiatric Society

स्वभावदोष

स्वभावदोष

प्रत्येक व्यक्तीचे एक विशिष्ट व्यक्तिमत्व असते. या व्यक्तिमत्वामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे स्वभाव गुण सगळ्यांमध्येच दिसून येतात. परंतु काहींच्या बाबतीत मात्र हे गुण एका मर्यादे पलीकडे जाऊन त्रासदायक ठरतात. त्यांना या आपल्या गुणांबद्दल कळतं किंवा काही लोकांना कळत देखील नाही. परंतु सभोवतालच्या लोकांना मात्र त्यांचे हे स्वभाव गुण, विचार, भावना, वर्तणूक इतरांपेक्षा खूप वेगळे आणि विकृत जाणवतात.

स्वभावाला औषध नाही असा ठाम समज आपल्या समाजात दिसून येतो. परंतु एखाद्याचा स्वभाव दोष किंवा विकृत स्वभाव गुणांमुळे इतर लोक त्रासलेले असतात, त्यावेळी मानसोपचार तज्ञांची मदत उपयोगी पडू शकते. सर्वसामान्यपणे दहा ते वीस टक्के लोकांमध्ये कुठल्यातरी प्रकारचा स्वभाव दोष दिसून येतो. अनुवंशिकता, जन्मत: मिळणारे स्वभाव गुण, सभोवतालच्या व्यक्तींचे वर्तन, एकमेकांसोबत घडणारा व्यवहार, चहूबाजूंनी मिळणारे अनुभव, शिक्षण, वाचन, संस्कार इत्यादी अनेक घटक आपला स्वभाव- व्यक्तिमत्व घडवण्यात मोठी भूमिका निभावतात. काही मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे व्यक्तिमत्व दोषाचे मूल्यमापन करून निदान करणे सोपे जाते. एखाद्या व्यक्तीमध्ये एकाहून अधिक स्वभावदोष देखील आढळू शकतात. लहानपणापासून स्वभावातील विकृत गुण हळूहळू दिसत असले तरी साधारणतः या मनोविकाराचे निदान वयाच्या 18 वर्षानंतर केले जाते. शास्त्रीय पद्धतीने स्वभाव दोष हे साधारणतः ए, बी आणि सी अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहेत.

स्किझोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अशा लोकांना साधारणपणे आपल्या समाजामध्ये अबोल, एकलकोंडे असे म्हटले जाते. या स्वभावदोषाचे लोक समाज संबंधांपासून अलिप्त राहतात आणि जवळच्या नातलगांमध्ये असताना फारच सीमित भावनिक हावभाव दर्शवितात. त्यांची कुणाशीही वैयक्तिक घट्ट संबंध, जवळीक किंवा सलगी करण्याची मनात इच्छा नसते. तसे सौख्य जुळविण्याची संधी चालून आली तरी त्याबद्दल हे लोक बेफिकीर असतात. कुटुंबाचा आणि समाजाचा भाग असल्यातून त्यांना काही समाधान मिळत नाही. मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत राहण्यापेक्षा त्यांना एकटंच राहणं जास्त पसंत पडतं. सतत मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसणे, शब्दकोडे सोडवणे, संगणकीय खेळ, वाचन इत्यादी आणि जेथे इतरांचा फारसा सहभाग नसेल अशा तांत्रिक व कल्पनात्मक छंद व कार्यात ते मग्न असतात. ते कुणाला भेटत नाही किंवा कोणी त्यांना भेटायला येत नाही, नातलगांच्या आग्रहाखातर लग्न केले तरी वैवाहिक जीवनातही ते एकलकोंडेच व उदासीन दिसतात, त्यांची कोणी स्तुती किंवा टीका केली तरी देखील काहीही फरक पडत नाही. इतर लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याची देखील त्यांना फिकर नसते. सभोवताली घडणाऱ्या गुढ मार्मिक कुठल्याही घटनांबद्दल त्यांना काही घेणेदेणे नसते, त्यावर ते काही प्रतिक्रिया देखील दाखवत नाहीत. इतर लोक त्यांना मक्ख, एकदम थंड स्वभावाचे व त्यांच्या नाकावरील माशी देखील उडत नाही असे म्हणतात. स्किझोइड  व्यक्तिमत्व असलेले लोक कधीतरी थोडेसे हास्य प्रकट करतात किंवा फक्त मान डोलावतात. समोरून कोणी डिचवलं, थट्टा मस्करी केली तरी देखील त्यांना क्रोध, आनंद अशा भावना उफाळून दिसत नाहीत. जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते निष्क्रिय राहतात. परंतु एकट्यानेच करण्याचे काम व्यवहार ते चांगल्या प्रकारे करू शकतात. तणावजन्य परिस्थितीमध्ये भावनिक तोल सांभाळता न आल्याने थोड्या काळासाठी ते भ्रमिष्ट होऊ शकतात. स्कीझोईड स्वभावदोष हा मतीभ्रम किंवा स्किझोफ्रेनिया अशा मनोविकारांचे पूर्व संकेत वा सूचना ठरू शकतो. एकलकोंडा लोकांना औदासिन्य आजार व इतर स्वभाव दोषही जडू शकतात. 

साधारणतः जनसामान्यात दोन ते चार टक्के, प्रामुख्याने पुरुषांमध्ये संशयी स्वभाव दोष किंवा प्यारानोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर दिसून येतो. या विकृत स्वभावामध्ये व्यक्तीला सतत इतरांबद्दल संशय, अविश्वास जाणवतो आणि इतरांचे हेतू त्यांना नेहमी द्वेष पूर्ण वाटतात. लोक आपला गैरफायदा घेतात, फसवतात, लबाडी करतात, इजा पोहोचवतात असे यांना वाटत असते. पुरावा नसताना देखील अशा बाबी ते सत्यच मानतात. कधीही थोड्याशा किंवा काहीही खाणाखुणा नसताना लोक आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतात, आपल्यावर हल्ला करतील असा संशय देखील त्यांना जाणवतो. संशयी व्यक्तिमत्त्वाचे लोकांना नेहमीच असे वाटते की दुसऱ्या लोकांनी त्यांना खोलवर दृढ इजा केलेली आहे. मनात मित्र सहकाऱ्यांच्या निष्ठा विश्वासाबद्दल असमर्थनीय शंका कुशंकांनी घर केलेले असते. त्यांच्या दृष्टीने आढळलेली इतरांची थोडीशी चूक त्यांच्या मानलेल्या गृहीत गोष्टीला आधार देते. त्यांना ज्यावर विश्वास नाही अशा एखाद्याने निष्ठा दाखवल्यास ते आश्चर्यचकित होतात. एखाद्या संकटात सापडल्यास मित्र व आप्त मंडळी एकतर आपली खिल्ली उडवतील, टीका करतील वा दुर्लक्षच करतील असे ते अपेक्षित धरतात. इतरांशी जवळीक साधण्यास व विश्वासाने काही सांगण्यास ते नाखूष असतात, कारण अशी माहिती त्यांच्या विरुद्ध वापरली जाईल अशी भीती असते. इतरांशी काही घेणेदेणे नाही असे म्हणून वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात. सौम्य कनवाळू शेरा वा घटनांचा ते धमकी वजा छुपा उलट अर्थ लावतात. जसे छोट्याशा चुकीचा हेतू पुरस्सर केलेला कट वा प्रासंगिक थट्टा मस्करीचा गंभीर चारित्र्यावरील घणघात समजतात. स्तुती प्रशंसेचा चुकीचा अर्थ काढतात, जसे प्रगतीबद्दल स्तुती केल्यास स्वार्थीपणाबद्दलच टीका वाटते, कोणी मदतीचा हात पुढे केल्यास आपण स्वतः अपुरे पडत असल्याची टीका होते असे वाटते. इतरांबद्दल नेहमी असूया, द्वेष वाटतो. त्यांच्या दृष्टीने इतरांनी केलेल्या अपमान आणि नुकसानाबद्दल क्षमा करण्यास ते कधीही तयार होत नाही. शुल्लक अनादर त्यांच्या मनात भयंकर शत्रुत्व निर्माण करतो आणि अशा विरोधी भावना दीर्घकाळ मनात रुतून बसतात. इतरांच्या अपायकारक हेतूंबद्दल ते सतत सावध सतर्क असतात, वाटलेल्या अपमानाचा बदला ते संधी न दवडतात ताबडतोब आक्रोश – रागाने प्रतिहल्ला चढवत व्यक्त करतात. ते विकृतपणे मत्सरी असतात, पुराव्या अभावी आयुष्याच्या जोडीदाराच्या चरित्रावर संशय घेतात, त्यासाठी व्यर्थ शिल्लक पुरावे गोळा करतात, आंतरिक सलगी व्यवस्थित राहून विश्वासघात होऊ नये या भीतीने ते जोडीदारावर पुरेपूर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी नजर ठेवून ते वारंवार जोडीदार कुठे आहे, काय करतोय असे चरित्राबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतात. 

असा संशयी स्वभाव दोष असणाऱ्या लोकांसोबत पटणे कठीण असते व त्यांच्याशी जवळचे नातेसंबंध टिकवण्यात अनेक समस्या उत्पन्न होतात. राजरोसपणे वादविवाद, सततच्या तक्रारी आणि रागाने एकटे, शांत राहून त्यांचा अतिजास्त संशय आणि वैरभाव दिसून येतो. संभाव्य धोक्याबद्दल नेहमी अतिदक्ष असल्याने ते सावधतेने गुप्त अविर्भावात वेगळेच वागतात. ज्यामुळे मायाळू प्रेमळपण नसून ते भावनाशून्य आतल्या गाठीचे जाणवतात. सत्यवादी, समजदार व गंभीर वाटत असले तरी बहुतांशी त्यांच्या चेहेऱ्याचे हावभाव प्रामुख्याने सतत बदलणारे, हट्टी, दुराग्रही, मर्मभेदक, झोंबणारे दिसत असतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे सभोवतालच्या लोकांची चिडचिड होते.

स्कीझोटाईपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच विक्षिप्त स्वभाव विकृती. हा या शृंखलेतील तिसरा व्यक्तिमत्व गुणदोष. या प्रकारामध्ये व्यक्तीचे विचार आणि चेहऱ्यावरील हावभाव यामध्ये विक्षिप्तपणा दिसून येतो. बोटांशी काहीतरी चाळा करणे, कसलाचा गुरुमंत्र म्हणणे, वहीमध्ये काहीतरी मंत्र लिहीत बसणे, एखाद्या गोष्टीवर अनाठाई तक्रारी करणे, कोणावर विश्वास न ठेवणे, ग्रह तारे ज्योतिष यांच्यावर अनाठाई अतिविश्वास, उपवास जप मंत्र पूजाअर्चा अशा गोष्टींमध्ये भरपूर वेळ घालवणे, शुभ अशुभ बघत राहणे, स्वप्नांचा त्याच्याशी संबंध लावणे, चिडचिड करणे रागावणे, विक्षिप्त विचित्र आणि स्वमग्न असे हे व्यक्ती असतात. ते चिंतामग्न, संशयी, अविश्वासू, अंधश्रद्धाळू, स्वप्नाळू आणि आभासी विश्वात रमणारे असतात. इतर लोकांना ते रुक्ष, निरस व भावनाशून्य जाणवू शकतात. अवैज्ञानिक असे जादुई विचार करण्यात ते मग्न असतात. अशा स्वभावदोषाच्या व्यक्तींना उदासीनता, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता असल्या प्रकारचे मनोविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते. 

एकंदरीत स्वभावदोषांमध्ये अस्थिर भावना असलेला बॉर्डर लाईन स्वभावदोष सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दुपटीने दिसणाऱ्या या प्रकारात उदासीनता, व्यसनाधीनता असे इतर विकारही जोडीला आढळतात. या स्वभावदोषाची लक्षणे म्हणजे ठराविक व्यक्तींकडे गरजेपेक्षा जास्त आकर्षित होणे, त्यांच्याशी अधिकाधिक जवळीक- सलगी साधणे, मात्र आपल्या इच्छेनुसार कोणी वेळ देऊ शकले नाही तर अनाठाई संताप करणे, संतापल्यावर आरडा ओरड करणे, वस्तू फेकून मारणे, तोडफोड करणे, शिवीगाळ करणे, काही काळानंतर आपल्या वागण्याबद्दलच पश्चाताप होणे, अपराध्यासारखं वाटणे असे प्रकार वारंवार घडतात. आपल्याकडे कुणीतरी सतत लक्ष द्यावे असे त्यांना सतत वाटते, इतरांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी असे लोक नेहमी प्रयत्नशील असतात. एकट्यामध्ये असताना मात्र खूप रिकामे, कंटाळवाणे वाटते. अशा लोकांची मनस्थिती क्षणोक्षणी भिरकावे घेते. कधी खूपच आनंदी, तर कधी खूप उदास, चिडचिड, क्रोध. अनेक मित्र मैत्रिणी जमवणे, परंतु कोणा एकासोबतही फारशी गट्टी न जमणे. बहुतांशी मित्रमंडळीच काही काळानंतर अशा व्यक्तींपासून दुरावा घ्यायला लागतात. मैत्री संपुष्टात आल्यावर हे लोक उदास निराश होतात, प्रसंगी संतापाच्या भरामध्ये आत्महत्यांचे देखील प्रयत्न ते वारंवार करताना दिसतात. अशा लोकांच्या हातांवर ब्लेडने कापल्याच्या खुणा सामान्यपणे बघायला दिसतात. बॉर्डर लाईन प्रकारातील लोक नेहमीच संकटात सापडल्यासारखे दिसतात. क्षमते एवढं ते क्वचितच काम करू शकतात, त्यांना अधून मधून सूक्ष्म अशी काही काळापूर्ती भ्रमभास विमनस्क अवस्था ग्रासते. इतरांची मदत घेण्यासाठी, लक्ष आकर्षण्यासाठी, आपला क्रोध अभिव्यक्त करण्यासाठी, कर्तव्य टाळण्यासाठी स्वतःच मनगटावर किंवा शरीरावर इतर भागी चीरा मारणे, सिगरेटचे चटके लावणे असे विध्वंसक प्रकार त्यांच्या वागण्यात दिसतात. त्यांना स्वतःबद्दलची प्रतिमा व व्यक्तिमत्व खूप अस्थिर जाणवते, पराधीनता व प्रतिरोध अशा दोन्ही प्रकारच्या भावना मनात असल्यामुळे इतरांसोबत त्यांचा नातेसंबंधांचा धागा कमकुवत असतो. अगदी जवळच्या माणसासोबत ते अतिलगटपणा व अतिक्रोध अशा दोन्ही भावना व्यक्त करतात.

बॉर्डर लाईन स्वभावदोषाप्रमाणेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या बाबतीत अधिक प्रमाणात दिसून येणारा अजून एक स्वभावदोष म्हणजे हिस्टरीओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. रंगबिरंगी कपडे, झकपक, गडद रंगांचे ड्रेस, प्रसंग व जागेला न शोभणारी वेशभूषा व रंगभूषा, डोळ्यांवर गॉगल, कानात गळ्यात नवनवीन दागिने, मनगटावर स्टायलिश ब्रेसलेट इत्यादींनी इतरांचे लक्ष आकर्षित करून घेण्यास ते सतत व्यस्त असतात. इतरांनी आपल्याकडेच कायम लक्ष द्यावे अशी यांची नेहमी इच्छा असते. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात आणि जशी लोक त्यांच्याकडे लक्ष देतात तसे ते व्यवस्थित राहतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास मात्र ते अस्थिर होतात, उतावीळ होतात, अस्वस्थ होतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि पुन्हा लक्ष वेधून घेण्यासाठी नकळतच ते काहीतरी नाटकीय, आताताईपणा करून इतरांना दुखावतात त्यांना चक्कर येते किंवा स्वताच बेशुद्ध होतात.  आरोग्याच्या बाबतीत घडीत चांगले तर घडीत आजारी अशी त्यांची अवस्था असते. बहुतांशी लक्षणे ही कुठल्याही वैद्यकीय आजारात न बसणारे असतात. विविध प्रकारच्या चाचण्या केलेल्या नॉर्मल येतात. भरपूर दवाखाने फिरून काहीही निदान होऊ शकत नाही अशी यांची नेहमी अवस्था असते. 

गुंड खोडसाळ असमाजिक कारस्थाने करणारे मंडळी आपण सभोवताली बघतो. साधारणतः माथेफिरू, असामाजिक तत्त्व, मानसिक संतुलन बिघडलेले इत्यादी विशेषणे अशा लोकांसाठी वर्तमानपत्रात आपण वाचतो. खरे तर असे लोक समाज विघातक स्वभाव दोषी म्हणजेच अँटीसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ने ग्रासलेले असतात. ते सतत इतरांच्या हक्क अधिकारांचे उल्लंघन करीत राहतात. आपल्या समाजातील रुढी नियमांशी ते जुळवून घेऊ शकत नाही. कुणाच्या मालमत्तेचे नुकसान करणे, गाडीचे काच फोडणे, रेघोट्या मारणे, त्रास देणे, चोऱ्या करणे, बेकायदेशीर व्यवहार करणे इत्यादी वर्तणुकीमुळे ते वारंवार कायद्याच्या चौकटीत पकडले जातात. इतरांच्या इच्छा भावना हक्क अधिकारांबद्दल त्यांना अजिबात आदर नसतो. पैसा, सत्ता, अधिकार, शक्ती, संभोग अशा वैयक्तिक लाभासाठी ते नेहमी कपटी व लाडीगोडीने वागतात. त्यांच्या व्यवहारात सतत खोटारडेपणा, खोट्या नावांचा वापर, फसवेगिरी, लुबाडणूक, ढोंगीपणा दिसून येतो. भविष्याचा विचार न करता ते आवेगात वागतात. तडकाफडकी कामधंदा सोडणे, रहिवास बदलणे, नातेसंबंध तोडणे असे स्वतःचा वा इतरांचा मागचा पुढचा तसेच परिणामांचाही विचार न करता आवेगातच निर्णय घेतात. आपल्या शीघ्रकोपी स्वभावामुळे ते लगेच आक्रमक होतात आणि वारंवार बायका पोरांना मारतात, इतरांशी भांडतात. स्वतः आणि लोकांच्या सुरक्षिततेबद्दल ते बेपरवाही दाखवतात, जसे गाडी चालवताना अति वेगाने चालवणे, नशेत चालवणे, अपघात घडवणे, छेडछाड, विभक्तपणा इत्यादी. लहानांची देखील ते काळजी घेत नाहीत व त्यांचा जीवही धोक्यात टाकू शकतात, वागण्यातील बेजबाबदारपणामुळे ते कामाला वारंवार दांड्या मारतात, चांगले दुसरे काम नसतानाही आहे ते काम सोडून देतात, विनाकारण बराच काळ बेकार राहतात. आपल्या वाईट वागण्याबद्दल त्यांना पश्चाताप सुद्धा नसतो. लोकांना दुखावल्याबद्दल, त्यांची मानहानी केल्याबद्दल, चोरी प्रकरणी ते बेपरवाहीने व सामान्यपणे वागतात किंवा उलट त्याचे समर्थन करतात, जसे आयुष्यात असे घडतच असते, त्याचे नशीबच खराब होते, त्याची लायकीच तशी होती. स्वतःच्या दोषाला बळी पडलेल्या व्यक्तीलाच ते कमनशिबी मूर्ख असहाय ठरवून आपल्या वाईट वर्तणुकीची गंभीरता कमी करू पाहतात. दुसऱ्यांच्या भावना कळत नसल्याने ते निष्ठूर उपहासी तिरस्काराने वागतात, तसेच गर्विष्ठ व मस्तावलेल्या वृत्तीने साधारण कामे आपल्या हाताखालीच चालतात असे वठवतात. वास्तवातील समस्या आणि भविष्याबद्दल त्यांना काहीही महत्त्व नसते. बोलण्यातील अस्कलितपणा, भुरळ, उथळ मोहिनी, मनमिळाऊ पण विषयाशी अनभिज्ञ लोकांशी बोलताना तांत्रिक शब्द वापरल्याने ते इतरांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. संबंधांबाबत एका जोडीदाराशी ते प्रामाणिक नसतात व अनेक जोडीदारांशी संबंध ठेवतात. एक पालक म्हणूनही ते निष्काळजीच असतात, ज्यामुळे मुलांच्या नशिबी कुपोषण, रोगराई, अन्न निवाऱ्यासाठी शेजाऱ्यांवर परावलंबत्व येते. त्यांचा जीवनाचा अंतही आत्महत्या, अपघात, खून अशा हिंसक रीतीनेच येऊ शकतो. अशा अँटी सोशल पर्सनॅलिटी असणाऱ्या स्वभावदोषींना औदासीन्य, सहन न होणारा कंटाळा, एकाकीपणा जाणवतो. तसेच त्यांच्यात भीतीरोग, नैराश्य, व्यसनरोग, जुगाराचा आजार असे मनोविकारही जास्त प्रमाणात आढळून येतात. 

नारसीस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच गर्विष्ठ, उद्धट, उर्मट स्वभावदोष असलेली लोक। या लोकांना अमर्याद यश, पैसा, बुद्धिमत्ता यांची स्वप्न पाहण्याची सवय असते आणि संपूर्ण जगात आपल्यासारखे कोणीच नाही असे त्यांना अभिमान वाटत असतो. ते नेहमी स्वतःच्याच प्रेमात असतात. सहकाऱ्यांना फुकटचे सल्ले देणे, इतरांच्या कामात नेहमी चुका काढणे, आपले मत निर्णय सदैव इतरांनी मान्य करावेत, आपल्याला श्रेष्ठ स्थान द्यावे अशी त्यांची नेहमी अपेक्षा असते, तसे न झाल्यास लोक आपला हेवा करतात, द्वेष मत्सर करतात असं त्यांना वाटते. स्वतःबद्दल त्यांच्या मनात अति महत्त्वाची फुगलेली भावना किंवा कल्पना निर्माण होते. ही लोक नेहमी अमर्याद यशाच्या कल्पनांमध्ये व्यस्त राहतात. त्यांचे वर्तन नाट्यमय रित्या इतरांचे लक्ष वेधून घेणारे आणि सतत कौतुकाची गरज असलेले भासते आणि आपल्या वर्तनाबद्दल कोणी टीका केल्यास ते तोंड देण्यास असमर्थ ठरतात. त्यांच्या मनात इतरांबद्दल सहानुभूतीचा अभाव तर असतोच उलट ते इतरांचे शोषण करण्यामागे लागलेले दिसतात. त्यांचा आत्मसन्मान डळमळीत असतो आणि अगदी किरकोळ घटनांमुळे देखील ते सहजपणे निराश होतात.

यानंतर पुढचा स्वभावदोष म्हणजे अंक्षीयस पर्सनॅलिटी डिसऑर्डर. या स्वभावदोषात व्यक्ती सतत काही ना काही ताणतणावामध्ये असतात आणि त्यांच्या मनात नेहमी भीतीची भावना निर्माण होते. स्वतःला ते सामाजिक दृष्ट्या अयोग्य, वैयक्तिकरित्या अप्रिय किंवा इतरांपेक्षा कनिष्ठ आहे असे समजतात. सामाजिक परिस्थितीत त्यांना टीकेला सामोरे जावे लागेल किंवा लोक त्यांना नाकारतील अशी त्यांना अतिशय जास्त प्रमाणात चिंता वाटत असते. अशी मंडळी पसंतीची खात्री असल्याशिवाय लोकांशी संवाद साधण्यात दिरंगाई करतात. शारीरिक सुरक्षिततेची सुद्धा गरज असल्याने ते स्वतःच्या जीवनशैलीमध्ये अनेक निर्बंध लावून घेतात, त्यांच्या या नकाराच्या भीतीमुळे त्यांना महत्त्वपूर्ण अशा सामाजिक व व्यावसायिक कामांपासून अलिप्त रहावे लागते, कमीत कमी जबाबदारी घेऊन काम करण्याची सवय अशा लोकांना असते. तणावजन्य परिस्थितीमध्ये त्यांची चिडचिड होते आणि अचानक संताप देखील ते प्रदर्शित करतात. सामान्य भाषेमध्ये लोक याला न्यूनगंड असे म्हणतात.

डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे इतरांवर अवलंबून राहण्याचा स्वभाव दोष. अशी मंडळी स्वतःसाठी योग्य तो निर्णय देखील घेऊ शकत नाही, निर्णय घेण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते व ते स्वखुशीने इतरांना त्यांच्यासाठी निर्णय घेण्याची परवानगी देखील देऊन टाकतात. आपल्या गरजा ते इतरांच्या अधीन ठेवतात आणि इतरांच्या इच्छांचे अवाजवी पालन देखील करतात. ज्यांच्यावर आपण अवलंबून आहोत त्यांच्याकडून अवाजवी मागण्या करण्याची त्यांना इच्छा नसते. एकटे असताना अस्वस्थ किंवा असहाय्य त्यांना वाटतं. जवळचे नाते असलेली व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याची भीती त्यांना सतत मनात वाटत राहते. इतरांकडून सल्ला किंवा आश्वासन न घेता त्यांना दैनंदिन निर्णय घेण्यास देखील मर्यादा जाणवते. ते स्वतःला असहाय्य, अक्षम आणि सहनशक्तीचा अभाव असलेले समजतात. इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून ते अनेक वेळेला स्वतः दुःख पत्करतात.

साधारणतः काही व्यक्ती आपल्या कामांमध्ये अत्यंत चोख आणि कडक निर्बंध पाळणारे आपल्याला दिसून येतात. हा देखील एक स्वभाव दोष असू शकतो. याला ऑफसेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी दिसोर्डर असे म्हणतात. अशा लोकांना वस्तू अगदी जागच्या जागी आणि ठराविक दिशेलाच लागते. हे लोक अति शंका आणि तपशिलांमध्ये व्यस्त राहतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांना स्वतःला व सहकाऱ्यांना देखील काम पूर्ण करण्यात अडथळा निर्माण होतो. ही लोक अति जास्त प्रमाणात कर्तव्यनिष्ठ असतात. अति अभ्यासूपणा आणि सामाजिक परंपरांचे पालन करणे, कडकपणा आणि हट्टीपणा यासाठी ओळखले जातात. तसेच इतरांनी देखील त्यांच्याच पद्धतीने काम करावे असा अवास्तव आग्रह ते धरतात .

Scroll to Top