Nashik Psychiatric Society

Basic Treatment strategies for Psychiatric Illnesses.

Basic Treatment strategies for Psychiatric Illnesses

नमस्कार, हा प्रश्न जवळ जवळ सर्वांना पडतो. की मनोविकारतज्ञ नक्की कशी ट्रिटमेंट करतात.
किंवा बऱ्याच वेळा हे माहिती नसल्यामुळे, काहीजण अगदी अवास्तव अपेक्षा देखील आमच्याकडून ठेवतात. किंवा बऱ्याच वेळा गैरसमजांमुळे ट्रिटमेंट अर्धवट घेतात. यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून नक्की वाचाल.

मनोविकारतज्ञ हे MBBS हे शिक्षण घेऊन नंतर मनोविकार या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टर असतात. त्यामुळे जेव्हा कुठलाही रुग्ण त्यांच्याकडे भेटायला जातो तर ते इतर डॉक्टरांसारखीच लक्षणांची सखोल माहिती घेतात, कधी सुरू झाला, वेळेनुसार लक्षणांमध्ये काही बदल होत आहेत का, दुसरे कुठले आजार आहेत, आणखी काही गोळ्या औषधे सुरू आहेत का, व्यसने आहेत का, घरामध्ये कोणाला मानसिक आजार आहे का, आजारी पडण्यापूर्वी त्या व्यक्तीचे आयुष्य कसे होते इ. हि आणि अश्याप्रकारची माहिती रुग्णांकडून आणि बऱ्याच वेळेला त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून सुद्धा घ्यावी लागते. याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करून मनोविकारतज्ञ आजाराचे निदान करतात.

कधी कधी आवश्यक असल्यास रक्ताच्या किंवा मेंदूच्या तपासण्या सुद्धा कराव्या लागतात. तपासण्या, आजार, आजाराची तीव्रता यानुसार नियोजन ठरते. रुग्णाला आणि नातेवाईकांना याची कल्पना देण्यात येते. हे सगळे लिहिण्याचे कारण रुग्ण मनोविकारतज्ञ भेट घेतल्यावर नेमके काय करतात हेच बऱ्याच जणांना माहिती नसते.

हे सर्व ठरल्यावर आजारानुसार आणि त्याच्या तीव्रतेनुसार नियोजन ठरते.
1. ऍडमिट किंवा भरती करणे.
2. कौन्सिलिंग करणे किंवा थेरपी करणे.
3. औषधोपचार.
4. विद्युत उपचार किंवा modified ECT उपचार.
5. केटामाईन उपचार.

ऍडमिट किंवा भरती करणे. जेव्हा आजार तीव्र स्वरूपाचे असतात. जसे की स्वतःची काळजी न घेणे, जेवण न करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे किंवा डोक्यात तसे विचार असणे, व्यसनमुक्तीचा पहिला टप्पा, किंवा अगदी आक्रमक असणे, दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्या जीविताची हानी होईल असे वर्तन असणे. या सर्व लक्षणांमध्ये आम्ही मनोविकारतज्ञ ऍडमिशन किंवा भरती होण्याचा सल्ला देतो.

कौन्सिलिंग करणे किंवा थेरपी करणे. सगळ्याच रुग्णांची अशी अपेक्षा असते की आम्हांला फक्त कौन्सेलिंग करून घ्यायची आहे. किंवा त्यातही काही पालकांची अवास्तव अपेक्षा असते की याच्या डोक्यातले हे काढून टाकायचे आहे म्हणून तुम्हांला भेटायचे आहे. या सर्वांना मी सांगु इच्छितो कौन्सिलिंग ही शास्त्रीय पद्धत आहे तिचे नियम आहेत, उद्दिष्ट आहेत, पद्धत आहे. माहिती नसल्यामुळे चांगले बोलणारे किंवा आपले मुद्दे चांगले रेटणारे स्वतःला कौन्सेलर म्हणवून घेत असतात, पण असे नसते. ही उपचार पद्धती मनोविकारतज्ञ आणि सायकॉलॉजिस्ट हे करतात आणि शिक्षण पाहून याच शिक्षित लोकांकडून करून घ्यायला हवी. नाहीतर याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असतेच.

औषधोपचार हा आजाराच्या प्रकारानुसार आणि तीव्रतेनुसार ठरतो. औषधांची जागतिक नियामक तत्वे असतात. त्यानुसारच आम्हांस औषधोपचार ठरवावा लागतो आणि त्याचे नीतीनियम पाळावे लागतात. आणि हो आम्ही देतो ती सगळीच औषधे झोपेची नसतात बरं का. खुप छान मोजके काम करणारी, कमीत कमी त्रास देणारी. इतर आजारांमध्ये आणि औषधामध्ये कमीत कमी लुडबुड करणारी अशी आहेत नवीन औषधे.

विद्युत उपचार किंवा modified ECT उपचार.
1. जेव्हा पेशंटच्या डोक्यात आत्महत्येचे विचार खुप तीव्र असतात.
2. तो जेवण घेत नसतो.
3. जेथे लवकर प्रतिसाद हवा असतो उदा. बाळंतीण स्त्री.
4. जेथे औषधांचे गुंते जास्त असतात जसे की उतारवयात होते.
5. स्वतःच्या जीविताची काळजी रुग्ण घेत नसतो तेव्हा.
6. किंवा औषोधोपचाराला जोडी म्हणून.

विद्युत उपचार किंवा इलेक्ट्रो कन्वलसिव थेरपी आम्ही सुचवतो. हि अत्यंत गुणकारी, लवकर आजार कमी करण्यास मदत करणारी. कमीत कमी साईड इफेक्ट असलेली. अशी उपचार पद्धती आहे. आज हा लेख लिहित असताना सुद्धा दोन रुग्णांना ही ट्रीटमेंट दिली आहे. याविषयी प्रचंड गैरसमज समाजात आहेत. पण मी सांगेल हि उपचार पद्धती खुपच गुणकारी आहे.
आत्महत्येच्या विचारांच्या उपचारामध्ये नव्याने समाविष्ट झालेली केटामाईन थेरपी एक आहे.

हे सर्व सांगण्याचे कारण याविषयी असलेल गुढतेचे वलय कमी व्हावे. गरज असेल तर नक्की जवळील मनोविकार तज्ञाला भेटा. ते योग्य तो शास्त्रीय उपाय सुचवतील. तुमच्या शंकांचे निरसन करतील, गैरसमज दूर करतील आणि सगळ्यात महत्वाचे तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने बदलवतील. मनोविकार तज्ञांना भेटणे म्हणजे म्हणजे वेडेपणाचे सर्टिफिकेट मिळणे नाही तर कदाचित ती तुमचे आयुष्य बदलणारी सगळ्यात आनंदी गोष्ट असु शकते हे लक्षात घ्या.

डॉ. मुक्तेश दौंड.

Scroll to Top