स्किझोफ्रेनिया : एक मानसिक आरोग्य समस्या
मानसिक आरोग्याच्या विकारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर व दीर्घकालीन आजार मानला जातो. या आजारामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये, वर्तनात, भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत व वास्तवाशी जोडून घेण्याच्या क्षमतेत मोठे बदल दिसून येतात. लोकांच्या समजुतीप्रमाणे हा “दुहेरी व्यक्तिमत्वाचा आजार” नसून हा एक विचार, भावना व वास्तव परीक्षण क्षमता बिघडवणारा विकार आहे. हा विकार स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही साधारणता समान प्रमाणात दिसतो. दर शंभर व्यक्तींमागे एका व्यक्तीला हा विकार होऊ शकतो.
लक्षणे
स्किझोफ्रेनियाची लक्षणे मुख्यतः तीन प्रकारांत विभागली जातात
1. पॉझिटिव्ह (Positive) लक्षणे
भास (Hallucinations) – न ऐकता आवाज ऐकू येणे, न दिसता दृश्ये दिसणे.
भ्रम (Delusions) – चुकीच्या व अवास्तव गोष्टींवर ठाम विश्वास ठेवणे, जसे कुणीतरी पाठलाग करत आहे, विष देत आहे इ.
विस्कळीत विचार व वर्तन (Disorganized speech & behavior).
2. नेगेटिव्ह (Negative) लक्षणे
भावनांचा अभाव किंवा कमीपणा (Blunted affect).
प्रेरणा कमी होणे (Lack of motivation).
सामाजिक संबंध टाळणे, एकटेपण वाढणे.
3. कॉग्निटिव्ह (Cognitive) लक्षणे
लक्ष केंद्रीत न होणे.
स्मरणशक्ती व निर्णय क्षमता कमी होणे.
नियोजन करण्यात अडचण येणे.
कारणे
स्किझोफ्रेनियाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु खालील घटक कारणीभूत ठरतात –
अनुवंशिक (Genetic) घटक – कुटुंबात हा आजार असल्यास धोका जास्त.
मेंदूमधील रसायनिक बदल (Neurochemical imbalance) – विशेषतः डोपामाइन, सेरेटोनिन व ग्लुटामेट या न्यूरोट्रान्समीटरचे (रसायनांचे) मेंदूतील असंतुलन.
पर्यावरणीय कारणे – गर्भावस्थेतील संसर्ग, प्रसूतीतील गुंतागुंत, बालपणातील ताणतणाव, व्यसन इ.
निदान
स्किझोफ्रेनियाचे निदान मानसिक आरोग्यतज्ज्ञ/ मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) हे लक्षणे, इतिहास व रुग्णाच्या वर्तनाच्या आधारे करतात. कधी MRI/CT Scan, रक्त तपासण्या इतर कारणे नाकारण्यासाठी केल्या जातात.
उपचार
स्किझोफ्रेनिया हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरी योग्य उपचार व समुपदेशनाने रुग्ण चांगल्या प्रकारे सामान्य जीवन जगू शकतो.
उपचारांमध्ये –
1. औषधोपचार
अँटिसायकॉटिक औषधे (Antipsychotics) – पहिली पायरी.
नियमित औषधे घेणे अत्यंत महत्त्वाचे.
2. मानसिक समुपदेशन (Psychotherapy)
Cognitive Behavioral Therapy (CBT).
कुटुंब समुपदेशन (Family Therapy).
3. सामाजिक पुनर्वसन (Rehabilitation)
रोजगार कौशल्य प्रशिक्षण.
सामाजिक आधार गट, समर्थन गट.
रुग्ण व कुटुंबासाठी टिप्स
लवकरात लवकर आणि नियमित तज्ञांचा सल्ला घेणे.
औषधे नियमित घेणे, थांबवू नयेत.
ताणतणाव कमी ठेवणे.
मद्यपान व नशा टाळणे.
कुटुंबीयांनी धीर, पाठिंबा व समजूत दाखवणे.
निष्कर्ष
स्किझोफ्रेनिया हा गंभीर पण उपचारक्षम मानसिक विकार आहे. योग्य वेळी निदान, नियमित औषधे व सामाजिक पाठिंबा मिळाल्यास रुग्ण समृद्ध व समाधानकारक जीवन जगू शकतो. समाजानेही या आजाराकडे कलंक म्हणून न पाहता मानसिक आरोग्य हा शारीरिक आरोग्याइतकाच महत्त्वाचा भाग आहे हे स्वीकारणे आवश्यक आहे.
–Dr. Nakul Vanjari.