Nashik Psychiatric Society

मानसिक आरोग्य – भारत आणि पाश्चात्य देश

मानसिक आरोग्य - भारत आणि पाश्चात्य देश

नमस्कार. एप्रिल २०२२ मध्ये मी नाशिक सोडून यू.के. मध्ये आलो आणि सध्या लंडनच्या जवळ काम करत आहे. मनोविकाराचे शिक्षण घेत असताना भारत आणि पाश्चात्य देशातील मानसिक आरोग्यासंबंधातील तौलनिक अभ्यास हा एक महत्त्वाचा भाग होता. पाश्चात्य देशात अनेक गोष्टी भारतापेक्षा उजव्या असण्याचा जसा समज आहे तसा मात्र तो मानसिक आरोग्याबाबत सरसकट म्हणता येणार नाही. अर्थात काही गोष्टी इथे चांगल्या आहेत तर काही गोष्टी आपल्या देशात चांगल्या आहेत. या विषयावरील हा थोडा अनुभावातून आलेला आणि थोडा संशोधनाचा आधार घेत लिहिलेला लेख.

मनोविकारांच्या उपचारांचे तीन घटक आहेत – बायो-सायको-सोशियल – अर्थात जैविक (औषधे, इंजेक्शन, ई.सी.टी. इत्यादी), मानसिक (समुपदेशन, मानसोपचार किंवा टॉकिंग थेरपी) आणि सामाजिक (कुटुंब, मित्रपरिवार, सामाजिक सहभाग, शिक्षण किंवा व्यवसाय). पाश्चात्य देशात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता अधिक आहे. लोकांमध्ये मानसिक समस्या आणि विकार यांचा स्वीकार अधिक आहे. तसेच त्यासाठी जैविक आणि मानसिक उपचार घेण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. त्याचबरोबर सामाजिक उपाययोजना आणि सेवा पुरवू शकणाऱ्या स्वास्थ्यसेवा आणि संस्था अधिक आहेत. आर्थिक तरतूदी आहेत. मनोसामाजिक कार्यकर्त्यांची उपलब्धता आहे. मनोरुग्णांना योग्य उपचार, मार्गदर्शन आणि योग्य वागणूक मिळावी, यासाठी पोलीसयंत्रणा, आरोग्ययंत्रणा, आणि इतर सामाजिक यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण तसेच या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची धोरणात्मक तरतूद आणि बंधन आहे तसेच त्याची अंमलबजावणी आहे. त्यामुळे मनोरुग्णाभोवती त्याला आधार देणाऱ्या यंत्रणांचे एक वर्तुळ तयार होऊ शकते. आणि व्यक्तीच्या पुनर्वसनाची वाट सुकर होते .

दुसरीकडे पाश्चात्य देशातील समाज हा अधिक व्यक्तिवादी आहे. कुटुंब व्यवस्था घट्ट नसल्याने स्वातंत्र्य अधिक असण्याबरोबरच कुटुंब विघटनाचे प्रमाण देखील अधिक आहे. मुलांसाठी आईवडील विलग किंवा घटस्फोटित असण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मनो-सामाजिक उपायासाठी गरजेच्या असणाऱ्या कौटुंबिक आधाराचा तुलनेने अभाव आहे. मनोरुग्ण व्यक्तीच्या प्रसंगी विक्षिप्त वर्तणुकीला मित्रपरिवारात, कुटुंबात स्वीकारण्याचे किंवा सामावून घेण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच अनेक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण अधिक आहे. शासकीय आरोग्यसेवा मोफत असली तरी स्तरानुसार आणि विशिष्ट पद्धतीने काम करते. त्यामुळे रुग्ण मानसोपचार विभागापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. बऱ्याचदा टोकाचे पाऊल उचले पर्यंत प्रतीक्षा यादीत रुग्णाचे नाव पुढे सरकत नाही. आणि खाजगी वैद्यकीय सेवा प्रचंड महागड्या आहेत.

आता आपल्याकडील व्यवस्थेबाबत बोलूयात. आपल्या देशात बऱ्याच सकारात्मक गोष्टी हळू हळू वाढत आहेत. भारतात गेल्या काही वर्षात स्वयंसेवी संस्था आणि टेली-कौन्सेलिंगच्या माध्यमातून चांगले परीणाम दिसू लागले आहेत. सर्वसाधारण मानसिक आरोग्य सेवा ‘तज्ज्ञ’केंद्रित न ठेवता अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी लोक आणि संस्था, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादींच्या सहकार्याने उत्तरोत्तर चांगली होत आहे. तसेच शासकीय आणि खाजगी तज्ज्ञ उपचार आणि सेवा सहज उपलब्ध आहेत. शिवाय खागजी वैद्यकीय सेवा या तितक्या महागही नाहीत.

असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे ही तितकेच खरे. उदाहरणार्थ मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता आणि मानसिक समस्या आणि विकारांचे निदान व उपचार यांचा सहज स्वीकार अजून चांगले होणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांतील समन्वय हा अपवाद म्हणून पाहायला मिळतो, तो तसा नको असून त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भागच असायला हवा. आर्थिक तरतूद तर हवीच आहे. मेंटल हेल्थ केअर ऍक्ट २०१७, मानसिक आरोग्य कार्यक्रम इत्यादी अनेक उत्तम शासकीय आणि कायदेशीर गोष्टींची तरतूद होत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी सातत्याने, सहजतेने, आणि एकसमान होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच स्तरातून एक प्रबळ ईच्छाशक्ती आवश्यक आहे. त्यातील यश हे विशिष्ट व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या प्रेरणेपेक्षा सिस्टिमचा भाग म्हणून अपेक्षित असावे. अर्थात या सगळ्याकडे आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातूनही पाहायला हवेच.

या सगळ्या मर्यादा असूनही काही आश्चर्यकारक पण सुखद अशा गोष्टी समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अभ्यासानुसार भारतात ५ वर्षानंतर स्किजोफ्रेनिया रुग्णांच्या ४२% प्रकरणांत सर्वोत्तम परिणाम दिसून आले, तर विकसीत देशांत ही संख्या फक्त १० ते १७% होती. भारतासारख्या विकसनशील देशात या विकाराच्या रुग्णांचे पुनर्वसन आणि स्वीकार अधिक चांगले होते हे निदर्शनास आले. एका अभ्यासानुसार ब्रिटन मधील भारतीय वंशाच्या मुलांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण हे ब्रिटिश किंवा इतर गोऱ्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण आपली सामाजिक संरचना असावी असा त्यांचा अंदाज होता. आपल्याकडे समूह-भावना अधिक आहे. एकत्र कुटुंब पद्धत आता अगदी पूर्वीसारखी नसली तर एका वेगळ्या स्वरूपात का होईना पण टिकून आहे, जसे विभक्त राहून वारंवार येणेजाणे असणे, संबंध ठेवणे इ. नात्यांची वीण अधिक घट्ट आहे. त्यामुळे एकमेकाला धरून ठेवणे, सामावून घेणे हे अपेक्षित असते. व्यक्तीला भावनिक आधार, संवाद, आणि सुरक्षितता यातून मिळते. मनोरुग्णांच्या बाबतीतही हे होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम रोगमुक्ती आणि पुनर्वसन यावर अधिक होतो. कुटूंब व्यवस्था घट्ट आहे. पारंपरिक मूल्ये आणि अध्यात्मिकता आहे. कर्त्यव्य म्हणून असेल, जबाबदारीपूर्वक असेल किंवा यंत्रणांचा अभाव असल्याने असेल, पण कुटुंबातील वृद्ध किंवा आजारी व्यक्तीची देखभाल आणि काळजी घेण्याचे प्रमाण पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक आहे. रुग्णाच्या बरे होण्यात या सगळ्याचा एक निश्चित सकारत्मक परिणाम दिसून येतो. तुलनेने भक्कम अश्या नात्यातील नियमांमुळे आणि बंधनामुळे वर्तणुकीला एक सकारात्मक चाप बसतो. मुलांच्या वाढीसाठी एक स्थिर कुटुंब असण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना आदर्श घालून देण्यात मोलाची भूमिका असणाऱ्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती ह्या सारख्या बदलत नाहीत, त्यात सातत्य असते.

आपल्या देशाची आणि समाजाची ही सारी बलस्थाने आहेत. ती अधिक सबळ करूयात. काळाबरोबर कराव्या लागणाऱ्या बदलांचा स्वीकार करूयात. मानसिक आजार म्हणजे कलंक असण्याच्या विचाराला पूर्णपणे तिलांजली देऊ यात. अंधश्रद्धांना खतपाणी न घालता, स्थानिक भावना आणि समजुतींचा सन्मान राखत, त्यांचा जमेल तिथे योग्य वापर करून, वैज्ञानिक उपाययोजनांचा अवलंब अधिक प्रमाणात करूयात. धन्यवाद.

डॉ. अभिजीत कारेगांवकर, मनोविकार तज्ज्ञ, वेलीन गार्डन सिटी, यू. के. (03/09/2025)

Scroll to Top