महिला आणि मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य म्हणजे मन शांत, विचार संतुलित आणि जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहण्याची क्षमता. आपल्या शारिरीक आरोग्य इतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. आजच्या काळात महिलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण महिला एकाच वेळी आई, मुलगी, पत्नी, व्यावसायिक, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावतात.
महिलांच्या मानसिक आरोग्यावर विविध गोष्टींमुळे परिणाम होतो. सामाजिक अपेक्षा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ताण, नातेसंबंधातील गुंतागुंत, तसेच मातृत्व व रजोनिवृत्तीतील हार्मोनल बदल यांचा खोलवर परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर
होतो. अनेकदा महिला स्वतःच्या भावना दडपून टाकतात, कारण त्यांना “मजबूत राहायलाच हवे” किंवा “घर सांभाळणं हेच माझं कर्तव्य आहे” अशी शिकवण दिली जाते. पण हे दडपणच हळूहळू चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, चिडचिड किंवा आत्मविश्वास कमी होणे अशा समस्यांना जन्म देते.
पण लक्षात ठेवा – मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे कमजोरीचे लक्षण नाही, तर ती स्वतःबद्दलची जबाबदारी आहे. जसं आपण एखाद्या शारीरिक आजारावर उपचार घेतो, तसंच मानसिक तणावासाठीही योग्य मदत घेणे गरजेचे आहे. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांच्याशी बोलणे हे पाऊल धाडसाचे आहे, लाजेचे नाही.
स्वतःसाठी वेळ काढा. दररोज थोडा वेळ ध्यान, प्राणायाम, चालणे, वाचन किंवा आवडीच्या छंदासाठी द्या. हे लहान लहान उपाय मनाला बळ देतात. ‘मीही महत्त्वाची आहे’ ही जाणीव मनात घट्ट रोवा. कारण एक निरोगी, आनंदी महिला संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा आधारस्तंभ आहे.a
महिलांनी मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला केव्हा घ्यावा?
आपल्या मनालाही कधी कधी विश्रांती आणि आधाराची गरज असते. जर खालील लक्षणे सतत जाणवत असतील, तर मदत मागणे हा धाडसाचा आणि स्वतःबद्दलच्या प्रेमाचा मार्ग आहे:
सतत दुःख, निराशा किंवा रिकामेपणाची भावना
झोप न लागणे किंवा खूप जास्त झोप येणे
दैनंदिन कामांसाठी ऊर्जा न राहणे
सतत भीती, चिंता किंवा अपराधगंडाने मन त्रस्त होणे
स्वतःबद्दल नकारात्मक विचार, आत्मविश्वास कमी होणे
वारंवार राग, चिडचिड किंवा नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होणे
ही लक्षणे कमजोरी दर्शवत नाहीत, उलट आपल्या मनाला काळजीची अणि मुदतीची गरज आहे हेच सांगतात. वेळीच मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घेतल्यास उपचार लवकर आणि प्रभावी होतात. मन पुन्हा संतुलित होते, आनंद आणि आत्मविश्वास परत मिळतो.
महिला म्हणजे कुटुंबाचा आत्मा. तिचे मन निरोगी असेल तर घर उजळून निघते. म्हणून स्वतःवर प्रेम करा, गरज पडल्यास मदत घ्या, आणि लक्षात ठेवा – निरोगी मन हीच खरी शक्ती आहे, आणि ही शक्ती तुमच्यात आधीपासूनच आहे.
— डॉ. प्रिया राजहंस.